दीपक मोहिते,
” डावपेच,”
सहाही जागा लढवण्याचा बविआचा निर्णय ; आ.ठाकुरांची धूर्त राजकीय खेळी,
बविआने पालघर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका लढवण्याचे जाहीर केले आहे.त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.त्यांच्या या धूर्त राजकीय खेळीमुळे महायुती व महाविकास आघाडी हे दोघेही अडचणीत येण्याची शक्यता आहे.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बविआच्या उमेदवारांचा पराभव झाला असला तरी त्यांनी घेतलेली मते,ही दुर्लक्षित करता येणार नाहीत.डहाणू विधानसभेचे आ.कॉम्रेड विनोद निकोले व विक्रमगडचे आ.सुनील भुसारा हे दोघेही आ.ठाकूर यांचे जिवलग मित्र,त्यामुळे त्यांच्यासमोर आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यामागे आ.ठाकूर यांची निश्चित राजकीय खेळी आहे.मात्र त्यांच्या या खेळीमुळे राजकीय पक्ष मात्र दबावाखाली येणार आहेत.त्यांच्या या खेळीचा फटका महाविकास आघाडीला बसतो कि महायुतीला ? हे यथावकाश स्पष्ट होईलच,पण सध्या तरी राजकीय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची घाबरगुंडी उडाली आहे.
तुम्ही,माझ्या हक्काच्या वसई,नालासोपारा व बोईसर या तीन विधानसभा मतदारसंघात मला डॅमेज करण्याचा प्रयत्न कराल, तर आम्ही तुम्हाला डहाणू,विक्रमगड व पालघर या तीन विधानसभा मतदारसंघात तुम्हाला घाम फोडू,असा एकप्रकारे इशाराच त्यांनी दिला आहे.या तीन विधानसभा मतदारसंघात बविआचे उमेदवार जिंकू शकणार नाहीत,पण समोरच्या उमेदवाराची नक्कीच दमछाक करू शकतात.ऐन निवडणुकीच्या काळात आ.हितेंद्र ठाकूर ज्या काही राजकीय खेळी करतात,त्या १०० % यशस्वी ठरतात,असा आजवरचा अनुभव आहे.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यानी आ.राजेश पाटील यांना रिंगणात उतरवल्यामुळे महाविकास आघाडीच्या भारती पाटील यांना दगाफटका झाला.बविआचा उमेदवार नसता तर भारती कामडी यांनी बाजी मारली असती.या लढतीत राजेश पाटील,हे तिसऱ्या क्रमांकावर गेले असले तरी,त्यांनी घेतलेली मते ही महाविकास आघाडीला डॅमेज करणारी ठरली होती.त्यामुळे या निवडणुकीत सहा जागांवर उमेदवार उभे करण्याच्या निर्णयामागे धूर्त राजकीय खेळी आहे,मात्र या खेळीचा दगाफटका महायुतीला बसतो कि महाविकास आघाडीला ? हे २३ नोव्हें.रोजी होणाऱ्या निकालामध्ये स्पष्ट होणार आहे.तसेच महायुती किंवा महाविकास आघाडीचे नेते,आ.ठाकूर यांच्या या अशा खेळीमुळे टेबलावर येतील व चर्चा करतील,अशीही शक्यता आहे.

