दिपक मोहिते,
” भयावह वास्तव,”
देशात कुपोषण व उपासमारीमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांच्या संख्येत सतत वाढ…
ग्लोबल हंगर इंडेक्सच्या यंदाच्या वार्षिक अहवालामध्ये आपल्या देशाची परिस्थिती अत्यंत वाईट अशी असून १३.७ % जनता कुपोषित असल्याचे म्हंटले आहे.ही संस्था जगभरातील उपसमारीच्या परिस्थितीवर लक्ष ठेवत असते.चीन,नेपाळ,बंगला देश व श्रीलंका या देशापेक्षाही आपली स्थिती अत्यंत खालावली असल्याचे उघड झाले आहे.जगभरातील १२७ देशाच्या यादीत आपण १०५ व्या क्रमांकावर आहोत.त्यामुळे किती भयावह स्थिती निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आपल्या देशात अन्न सुरक्षा योजनेंतर्गत ८० कोटी लोकांना फुकट जेवण देण्यात येत असल्याचा दावा केंद्र सरकारतर्फे करण्यात येत असतो.कोरोना काळापासून एका कुटुंबाला ३५ किलो अन्न धान्य ( गहू व तांदूळ ) मोफत दिले जाते,तेही महिन्यातून दोन वेळा,ही योजना देशाच्या ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवली जाते.मग कुपोषण व उपासमारीमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्याची संख्या सतत वाढत का आहे.आशिया खंडातील सर्व देशांच्या एकूण कुपोषणाच्या २७ % कुपोषण आपल्या देशात आहे.या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये येत्या काळात भारतातील कुपोषण व उपसमारीचे संकट अधिक गडद होईल,अशी भिती व्यक्त करण्यात आली आहे.गेल्या दहा वर्षात केंद्र व राज्यसरकार शिक्षण,आरोग्य व अन्नधान्य इ.सुविधा मोफत देत आली आहे.मग अशी परिस्थिती का निर्माण व्हावी ? या सुविधा देऊनही ग्रामीण भागातील जनतेचे जीवनमान उंचावत का नाही ? तसेच एका आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार आपल्या देशात दर मिनिटाला किमान तीन लोक उपासमारीने मरतात.जर आपण त्यांना सुविधा भरमसाठ व मोफत देतो,त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतात का ? याचा शोध सरकारने घ्यायला हवा.एकीकडे गरिबी आजही ” जैसे थे,” स्थितीत आहे,तर दुसरीकडे केंद्र सरकार लवकरच आपली अर्थव्यवस्था ५ ट्रीलियन डॉलर्स होईल व आपण जगात तिसऱ्या क्रमांकावर जाऊ,असा दावा करत असते.अशा परस्पर विरोधाभासाचा ताळमेळ कसा बसवायचा हा खरा प्रश्न आहे.

