दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
गद्दारी करण्यामागे सत्तेचा हव्यास,ईर्षा व स्वार्थ असतो..
शिवसेनेत झालेल्या बंडाला आता अडीच वर्षे पूर्ण होत आली आहे.२० जून २०२२ रोजी विधानपरिषदेची निवडणूक संपल्यानंतर एकनाथ शिंदे नॉट रीचेबल झाले,त्यानंतर ठाणे व्हाया सुरतमार्गे ते थेट गुवाहाटी व तेथून गोव्यात दाखल झाले.अशाप्रकारे गद्दारीचे एक वर्तुळ पूर्ण झाले.त्यानंतर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत अजित पवार यांनीही गद्दारी करण्यात,” हम भी कुछ कम नही,” दाखवून दिले.राजकारणात अशाप्रकारची जी गद्दारी होते,ती रिकाम्या पोटी नाहीतर भरल्यापोटी होत असते.हा एक प्रकारचा भसम्या रोग असतो.अशा रोगाची लागण झालेल्या रुग्णाची भूक कधीच मिटत नाही.
उद्धव ठाकरे व शरद पवार यांनी या दोघाना त्यांच्या राजकीय वाटचालीत काय दिले नाही.पण समाधान नसलेल्या व्यक्तीला तुम्ही कितीही भरभरून द्या,पण स्वार्थ आणि सत्तेपुढे ते नगण्य ठरत असते.आजवर भारतीय राजकारणात ज्या ज्या वेळी गद्दारी झाली त्याला अशीच पार्श्वभूमी आहे.इतिहासाची पाने उलटून पाहिली तर अशी अनेक उदाहरणे आपल्याला अनुभवायला मिळतात.पण गद्दारीचा हा आनंद मात्र चिरकाल टिकणारा नसतो,तो क्षणभंगुर असतो.न्यायदेवता जशी डोळ्याला पट्टी लावून न्यायदानाचे काम करत असते,तशा पद्धतीने नियती करत नाही.ती चहूबाजूकडे डोळसपणे पाहत असते,व अचूक वेळ साधत,स्वार्थी व संधीसाधू व्यक्तीला त्याची योग्य जागा दाखवून देते.या दोघांच्या बाबतीत सध्या हेच घडत आहे.या दोघांनी जेंव्हा गद्दारी केली तेंव्हा मी,” विनाशकाले विपरीत बुद्धी,” या शीर्षकाखाली सविस्तर विवेचन करणारा लेख लिहिला होता.त्या लेखात मी या प्रक्रियेतील धोके अधोरेखित केले होते.आज ते वास्तवात उतरताना पाहायला मिळत आहे.या दोघाना आता पश्चाताप म्हणून प्रायश्चितही घेता येणे शक्य नाही,कारण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे,” चुकीला माफी नाही,” हे मराठी माणसाचे ब्रीदवाक्य आहे.आजवर आपल्या देशातील अनेक राजघराण्यात झालेले गृहकलह व भाऊबंदकीने अनेक साम्राज्ये लयाला गेली.पण गेल्या आठशे वर्षात या रोगाचा समूळ नायनाट होऊ शकला नाही.सत्तेचा हव्यास,ईर्षा व स्वार्थ,अशा तीन स्तरावर मानवी जीवनाची वाटचाल सुरू झाली आहे.ती खंडित तर होऊ शकणार नाही,उलट त्यास अधिक वेग येण्याची शक्यता आहे.

