दीपक मोहिते,
वारे व्वा….
इशारे कोणाला देता ? आपल्या पायाखाली काय जळतय,ते पहा जरा..
काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आश्चर्याचा धक्का बसला.हे दोघे आपल्या भाषणात जे काही म्हणाले,ते समोर जमलेल्या प्रचंड गर्दीला पाहून भारावून गेले असावेत,असे वाटते.पण त्यांच्या या वक्तव्यामुळे लोकाना आश्रर्य वाटलेच,पण बऱ्यापैकी मनोरंजन देखील झाले.
राज्याचे मुख्यमंत्री शिंदे आपल्या भाषणात काय म्हणाले ते पहा जरा, विरोधकांना टोला लगवताना ते म्हणाले,मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे,मी आनंद दिघेसाहेबांचा चेला आहे,मला हलक्यात घेऊ नका,मी मैदानातून पळणारा नाही,तर पळवणारा नाही.अहो शिंदेसाहेब,बंड करण्यापूर्वी तुमचा माणूस ईडीच्या भितीने कुठे गायब झाला होता ? तुम्ही देखील त्याच ईडीच्या भितीने व्हाया सुरत गोहाटी गाठले होते,या घटनेचे तुम्हाला कसे काय विस्मरण होते बुवा ? वास्तविक मला हलक्यात घेऊ नका,हा इशारा राज्यातील गुन्हेगारांना व मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रस्तावावर स्वाक्षरी न करता रागाच्या भरात बैठकीतून निघून जाणाऱ्या अजित पवारांना द्यायला हवा होता.ते न करता तुम्हाला कात्रीत पकडणाऱ्या विरोधी पक्षाला तुम्ही इशारा देता,” यह तो बहोत बडी नाईन्साफी है,” असेच म्हणावे लागेल.
दुसरीकडे भाजपच्या सध्या पहिल्या फळीतील नेत्या व माजी कॅबिनेटमंत्री पंकजा मुंडे यांनीही भावनेच्या भरात आपल्या भक्तांसमोर ” मी गरिबांसाठी काम करणारी आहे,राजकारणाला चिटकून बसणारी नाही.असे बेफाम वाक्य बोलून गेल्या.त्यांच्या ” चिटकून,” या शब्दाने आम्हा पामराना सुखद धक्काच बसला.तुमच्या या एका वाक्याने आम्हाला विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या चिक्कीची आठवण करून दिली.गेली पाच ते सहा वर्षे उपेक्षित जीवन जगत त्या राजकारणाला कशा चिकटून राहिल्या होत्या,हे उभ्या महाराष्ट्राने ” याची देहा,याची डोळा,” आम्ही पाहिले.सतत उपेक्षा,हेटाळणी व डावलणे सहन करत तुम्ही राजकारणाला चिटकून राहिलात,तुमचे कौतुक करावे,तेवढे थोडेच…
तुमच्या परळीतील वैद्यनाथ सहकारी कारखान्याकडे युनियन बँकेचे २०३ कोटी ६९ लाख रु बॅंकेने तगादा लावला तसेच जीएसटीचे १९ कोटी रु.च्या थकीत रकमेसाठी छ.संभाजीनगर येथील जीएसटी आयुक्तांनी कारखान्यास नोटीस बजावली होती.अशावेळी केंद्रीय सहकार मंत्रालयाने अनेक सहकारी साखर कारखान्यांना आर्थिक मदत दिली,पण तुमच्या कारखान्याला त्यातून वगळण्यात आले होते.एवढं सारं सहन करूनही तुम्ही राजकारणाला चिटकून राहिलात,तुमच्या या अपार सहनशक्तीला तसेच चिटकून न राहणाऱ्या स्वभावाला दंडवत…

