दीपक मोहिते,
” न्यूजलाईन,”
पुरोगामी राज्य राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे पार रसातळाला गेले,
दुसऱ्याचे घर फोडण्यात आघाडीवर असलेल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस याना काल रात्री झालेल्या घटनेतून तरी शहाणपण येईल,अशी अपेक्षा आहे.राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती पार खालावली असताना आपले गृहमंत्री महाशय,हे तीन वर्षांपासून इतरांची घरे फोडण्याचे पाप करण्यात रममाण आहेत.लोकसभा निवडणुकीत आपटी खाल्यानंतरही फडणवीस यांचे डोके अद्याप ताळ्यावर आलेले नाही.बदलापूर बलात्कार,पुणे बलात्कार,पुण्यात कोयता गॅंगचा हैदोस,हिट अँड रनच्या वाढत्या घटना,त्या घटनातील आरोपींना वाचवण्याचे झालेले प्रयत्न,महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे,ओबीसी,मराठा व धनगर आरक्षण प्रकरणी त्यांच्याकडून होत असलेला ” अशी ही बनवाबनवी,” चा प्रयोग,महायुतीमधील अंतर्गत वाद,इ.कारणे आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या दारुण पराभवाला कारणीभूत ठरणार आहेत.गेल्या ६५ वर्षात महाराष्ट्राने इतका निष्क्रिय व बेजबाबदार गृहमंत्री कधीच पाहिला नव्हता.गृहमंत्री म्हणून त्यांचा गृहखात्यावर वचक नाही,गृहखात्याचे पोलीस यंत्रणेवर नियंत्रण नाही,आणि पोलिसांचा गुन्हेगारांना धाक नाही.त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला आता या सरकारचा अक्षरशः उबग आला आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही या अनागोंदी कारभाराला तितकेच जबाबदार आहेत.तुमचे-आमचे दुर्देव असे की आमचे मुख्यमंत्री हे मोदी-शहा यांची तळी उचलण्यात धन्यता मानत आहेत.मोदी यांनी आपल्या देशाचे नांव जगभरात गाजवले,असे सांगत ते सतत उर बडवत असतात.या अशा नाकर्त्या राज्यकर्त्यामुळे राज्याची घडी पार विस्कळीत झाली आहे.मंत्रिमंडळाच्या बैठकीत ” नळावरचे भांडण,” फुलफॉर्ममध्ये आहे.राज्याची तिजोरी रिकामी झाली आहे,कर्जाचा बोझा नऊ हजार कोटीच्या घरात पोहोचला आहे.अंगणवाडी,एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन व ठेकेदारांची बिले थकली आहेत,पण एकनाथ शिंदे मात्र दाढी कुरवाळत ” सबकुछ ठीक है,” असा सूर आळवत राज्यभर फिरत आहेत.राज्याची अशी दयनीय अवस्था रयतेने आजवर कधीही अनुभवली नाही.

