दीपक मोहिते,
” न्यूजलाईन,”
नळावरचे भांडण,
” सुंठीवाचून खोकला,” जाण्याच्या प्रतिक्षेत देवेंद्र फडणवीस,
शिंदे यांच्या ड्रीम प्रोजेक्टच्या मार्गात अजित पवार यांचा खोडा,
मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत मंत्री व शासकीय अधिकाऱ्यांना सार्वजनिक नळावर जस महिलांचे पाण्यासाठी भांडण होत असते,तसेच या बैठकीत पाहायला मिळाले.
गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामधून विस्तव जात नाही.अशावेळी अजित पवार यांनी अचानकपणे ” मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने,” चे ” माझी लाडकी बहीण,” असे नामकरण केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पारा चढला व मंत्रिमंडळाच्या प्रत्येक बैठकीत ” तीन पैश्याचा तमाशा,” सुरू झाला.नुकत्याच झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या स्वप्नातला ” अलिबाग-विरार कॉरिडॉर,” प्रकल्पाचा प्रस्ताव रेटला, त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्वाक्षरी केली,पण अजित पवार यांनी संमती दिली नाही.त्यामुळे शिंदे यांना या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली,अशी घोषणा करता आली नाही.या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास अजित पवार यांनी नकार दिला.ते या मंत्रीमंडळाच्या बैठकीतून तडक बाहेर पडले.त्यामुळे एकनाथ शिंदे यांचा संताप अनावर झाला.यावेळी देवेंद्र फडणवीस मात्र,” तुम लढो, हम कपडा सांभालते है,” अशा भूमिकेत होते.जे काही चाललंय ते आपल्या पथ्यावर पडणारे आहे,ते ओळखून असल्यामुळे ते ” ऐसाही चलने दो,” अशा विचारात गढून गेले होते.अजित पवार हे भाजप व शिंदे यांना नकोसे झाले आहेत,त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे ” सुंठीवाचून खोकला कधी जातो ? अशा प्रतिक्षेत आहेत.अजित पवार यांचे भर बैठकीतून निघून जाण्यावर आता ते जो काही खुलासा करत आहेत,तो पटणारा तर नाहीच,पण हास्यास्पद ठरला आहे.या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा हा शिंदे गटाला होणार आहे.पालघर,ठाणे व रायगड,या तीन जिल्ह्यातुन जाणाऱ्या प्रकल्पाचा सर्वाधिक फायदा या तीन जिल्ह्यातील लोकांना होणार आहे.या प्रकल्पाची घोषणा जर शिंदे यांना आता करता आली असती तर त्याचा आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला फायदा झाला असता,पण अजित पवार यांनी त्यामध्ये खोडा घातल्यामुळे एकनाथ शिंदे प्रचंड नाराज झाले आहेत.मात्र दुखावले गेलेले शिंदे गप्प राहणाऱ्यापैकी नाहीत,जागावाटपात ते अजित पवार यांना १००% खिंडीत पकडतील व त्यांना देवेंद्र फडणवीस हे अमित शहा यांच्या आडून मदत करतील.

