दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
सयाजी शिंदे यांना अशी उपरती का व्हावी ?
आपल्या कर्तृत्वाने उत्तुंग क्षेत्र गाठलेल्या व्यक्ती आपल्या जीवनात अनेकदा अक्षम्य चुका करत असतात,क्षणिक फायद्यासाठी त्यांनी उचललेले पाऊल,हे त्यांच्या यशस्वी करकीर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे ठरते.काल अशीच एक घटना घडली.सिनेसृष्टीमध्ये प्रतिभावंत कलाकार म्हणून ओळख असलेले सयाजी शिंदे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले.त्यांना अशी उपरती का झाली ? हे न समजणाऱ्या कोड्यासारखे आहे.प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे हे दोघेही ” पाणी,” व ” शेतकाऱ्यांच्या आत्महत्या,” या अत्यंत जिव्हाळ्याच्या दोन विषयावर त्यांच्या ” नाम,” संस्थेच्या माध्यमातून प्रचंड काम करत आहेत.पण त्यांनी कधीही राजकीय पक्षाची वाट धरली नाही.उलट नाना पाटेकर हे कायम राजकीय पक्षाच्या नेत्याना खडेबोल सूनावत असतात.सयाजी शिंदे यांचेही पर्यावरण क्षेत्रात अतुलनीय,असे कार्य आहे.वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन या महत्वाच्या विषयाला त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे.त्यांच्या या कार्याला राज्य सरकारची आर्थिक मदत व्हावी,त्यांच्या या कार्याला सरकारचे सहकार्य मिळावे,यासाठी त्यांनी अजित पवार यांचे जहाज गाठले असावे,असे प्रथमदर्शनी वाटते.पण अजित पवार यांचे हे जहाज सध्या बुडण्याच्या तयारीत आहे,तसेच त्यांच्या या जहाजाला अनेक ठिकाणी भोके पडली आहेत.त्यामुळे या जहाजावरील अनेक उंदराची सध्या पळापळ सुरू झाली आहे.अशावेळी त्यांनी या बुडत्या जहाजातून आपला राजकीय प्रवास करायचे ठरवणे,हे त्यांचे वागणे राजकीय वाटचालीला सुरुवात करताना,स्वतःच्या हातून स्वतःलाच अपशकुन करून घेण्यासारखे आहे.ज्या पक्षाचा पर्यावरण व वृक्षसंवर्धन,या दोन विषयाशी कधीही दुरान्वये संबध आला नाही,अशा पक्षाकडून ते फार मोठ्या अपेक्षा बाळगत असतील,तर ते स्वतःच्याच कामाशी प्रतारणा करत आहेत,असेच म्हणावे लागेल.त्यांच्या स्वागतप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अजित पवार व सुनील तटकरे यांची भाषणे ऐकल्यानंतर हसावं की रडावं,हेच कळत नव्हते.असो,सयाजी शिंदे यांचा हा निर्णय योग्य कि अयोग्य,हे ठरवणे आपले काम नाही.कारण कोणी काय करावे,हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो.मात्र त्यांचा हा निर्णय त्यांच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या चाहत्यांना न पटणारा असा आहे.

