दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
अजित पवारजी,आ.हितेंद्र ठाकूर यांच्यासारखे धाडस दाखवा,
राजकारणात कधी काहीही घडू शकते,हे आज नाशिकचे माजी आ.माणिकराव कोकाटे यांनी अजित पवार यांना दिलेल्या सल्ल्यावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास गेल्या काही दिवसांपासून मागे पुढे करत असताना कोकाटे यांनी त्यांना सिन्नर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवा,अशी ऑफर दिली.पक्षाचे अध्यक्ष इतरांना उमेदवारी देत असतात,पण कोकाटे यांनी सिन्नर विधानसभा सुरक्षित मतदारसंघ असून अजित पवार यांनी येथून उभे राहावे,असा मानभावी सल्ला दिला आहे.त्यांच्या या सल्ल्यानंतर काही क्षणात अजित पवार यांनी ” बारामती माझी आहे,त्यामुळे माझ्या घरट्यात मी जाणार,” असे स्पष्ट केले.कोकाटे यांनी जी ऑफर दिली,त्यावरून बारामती विधानसभा अजित पवार यांच्यासाठी सुरक्षित नाही,असे संकेत लोकामध्ये गेले,त्यामुळे अजित पवार खडबडून जागे झाले व त्यांनी ” आपली बारामती बरी,” अशी भूमिका घेतली.जेंव्हा आपला पक्षाघ्यक्ष आपल्या परंपरागत मतदारसंघात सुरक्षित नाही,हे कळल्यानंतर इतर आमदार,पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अवसान गळून पडते.या प्रकरणी नेमके तेच झाले आहे.वास्तविक अजित पवार,हे आपल्या पत्नीच्या पराभवामुळे पार खचले आहेत.आपण जर बारामतीमधून उभे राहिलो तर आपले काकाश्री आपल्या विरोधात आख्खे पवार खानदान मैदानात उतरवतील,अशी त्यांना भिती वाटत असावी,त्यामुळे ते अधून मधून आपल्या भाषणात, मी बारामतीमध्ये जो उमेदवार देईन,त्यांचे काम करावे लागेल,अशी निर्वाणीची भाषा करत असतात.याबाबतीत वसईचे आ.हितेंद्र ठाकूर यांचे उदाहरण त्यांनी डोळ्यासमोर ठेवले पाहिजे.आ.ठाकूर याना संकटांना अंगावर घेण्यास फार आवडते.संकटांना पाहून ते कधीही डगमगून जात नाहीत,व विचलितही होत नाहीत.गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र आ.क्षितिज ठाकूर यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांनी वादग्रस्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांस रिंगणात उतरवले होते.पण आ.ठाकूर यांनी त्या निवडणुकीत आपल्या प्रचारावर मेहनत न घेता,नालासोपारा विधानसभा मतदारसंघात धुवांधार प्रचार केला.विरोधी उमेदवाराने प्रचारात साम,दाम,दंड,भेद नितीचा वापर केला,पण आ.ठाकूर यांनी शांतपणे शर्मा याना शांतपणे मतदारसंघातून तडीपार केले.त्या निवडणुकीत आ.क्षितिज ठाकूर यांनी प्रचंड मताधिक्य घेतले.संकटे अंगावर घेऊन विरोधकांना भुईसपाट करणे,हा त्यांचा स्थायी स्वभाव आहे.गेल्या तीस वर्षात अनेक संकटे आली,पण त्यांनी ती आपल्या ताकदीवर अत्यंत शांतपणे परतवली.त्यांचा त्यांच्या कर्तृत्वावर प्रचंड विश्वास आहे,त्यामुळे ते संकटापासून कधी पळ काढत नाहीत.उलट संकट परतवण्यासाठी कंबर कसतात.अजित पवार हे देखील आ.हितेंद्र ठाकूर यांचे भाजप नेते विनोद तावडे व देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या नेत्यांचे जिवाभावाचे मित्र आहेत.त्यांनी आपल्या मित्राचे धाडस अंगी बिंबवले पाहिजे.कोकाटे यांनी तुम्हाला दिलेली ऑफर,तुमचे महत्व कमी करणारे आहे.काकाश्री तुमच्यासमोर नक्कीच आव्हान उभे करणार, यामध्ये तिळमात्र शंका नाही,पण त्याला तुम्ही सामोरे जा,बारामतीमधून पळ काढलात तर मात्र तुमचं काही खरं नाही,

