दीपक मोहिते,
आरक्षणाची दाहकता ; बांगला देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर,
आपल्या शेजारी असलेल्या बांगला देशात सरकारी नोकऱ्यांमध्ये ३० % आरक्षणाविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनास आज हिंसक वळण लागले.आंदोलक व पोलीस यांच्यात झालेल्या संघर्षात आतापर्यंत ८ विद्यार्थी व १३ पोलीसांचा बळी गेला आहे.तर पंतप्रधान शेख हसीना यांना आपल्या कुटुंबासह देश सोडावा लागला.या सर्व घडामोडीनंतर देशाची सूत्रे सध्या लष्कराच्या ताब्यात गेली आहेत.शेख हसीना याना आपला देश तात्पुरता आश्रय देण्याची शक्यता आहे.त्यानंतर त्या ब्रिटिश सरकारकडे राजाश्रय मागतील,अशी शक्यता आहे.
आरक्षणाची दाहकता किती भयावह असते,ते या सर्व घटनांवरून दिसून आले आहे.या संघर्षाची पार्श्वभूमी कशाप्रकारची आहे,हे पाहणे आवश्यक ठरते.१९७१ च्या स्वातंत्र्यलढ्यात ज्या स्वातंत्र्यासैनिकांनी भाग घेतला,त्यांच्या वंशजांसाठी नोकऱ्यांमध्ये सर्वाधिक ३० % आरक्षण ठेवण्यात आले आहे.या देशात सरकारी नोकऱ्यांमध्ये एकूण आरक्षण ५६ % इतके आहे.त्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकांचे वंशज-३० %,महिला-१० %,अविकसित जिल्ह्यातील नागरिक-१० %,आदिवासी-५ %,अपंग व्यक्ती-१ %,असे आरक्षण देण्यात आले आहे.मात्र स्वातंत्र्य सैनिकांच्या वंशजाच्या तिसऱ्या पिढीला हे ३० % आरक्षण देण्यास विद्यार्थ्यांचा विरोध आहे.१९७२ मध्ये तत्कालिन पंतप्रधान व शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांच्या सरकारने स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांसाठी ३० % आरक्षण जाहीर केले होते.२०१८ मध्ये शेख हसीना सरकारने ते रद्द केले.त्यांच्या या निर्णयाविरोधात स्वातंत्र्य सैनिकांचे वंशज उच्च न्यायालयात गेले.त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी होऊन रद्द करण्यात आलेले आरक्षण न्यायालयाने पुन्हा लागू केले.त्यानंतर सरकार व विद्यार्थी यांच्यामध्ये संघर्षाला तोंड फुटले.स्वातंत्र्य सैनिकांच्या तिसऱ्या पिढीला आरक्षण का द्यायचे,असा सवाल करत विद्यार्थी रस्त्यावर उतरले.आरक्षण हे एकूण गुणवत्तेवर असावे,असे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली.त्यावर वंशजानी पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.या याचिकेवर सलग तीन वर्षे सुनावणी झाल्यानंतर उच्च न्यायालयाने १ जुलै २०२४ रोजी आरक्षण पुन्हा लागू करण्याचा निर्णय जाहीर केला.त्यानंतर सरकारच्या महाधिवक्त्याने पुन्हा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली,न्यायालयाने उच्च न्यायालाच्या आदेशाला चार आठवड्याची स्थगिती दिली.यावेळी सरन्यायधिशानी विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घ्यावे,असे आवाहन केले,पण विद्यार्थ्यांनी आंदोलनाची धार अधिक वाढवली.आज विद्यार्थ्यांनी शेख हसीना यांच्या घरात घुसून तोडफोड केली.परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून शेख हसीना यांनी आपल्या बहिणीसह हेलिकॉप्टरने आपल्या देशातील त्रिपुरा राज्यात आश्रय घेतला.तुर्तास त्या भारतात असल्या तरी त्या ब्रिटिश सरकारकडे राजाश्रय मागतील,अशी शक्यता आहे.या सर्व घडामोडीनंतर बांगला देशाची सूत्रे लष्कराच्या ताब्यात गेली आहेत.दक्षिण आशियात आणखी एक देश वेगळ्या मार्गाने जाऊ लागला आहे.नेपाळ,म्यानमार,श्रीलंका,अफगाणिस्तान,
पाकिस्तान,मालदीव हे सारे देश अंतर्गत कलहामुळे कमकुवत झाले आहेत,या साखळीत आणखी एका देशाची भर पडली आहे.दक्षिण आशियातील देशातील परिस्थिती ही आपल्याला डोकेदुखी ठरणारी आहे.त्यामुळे बांगला देशातील या घडामोडीकडे आपले परराष्ट्र धोरण कसे असेल,हे आजच्या घडीला सांगणे कठीण आहे.

