दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
पालघर रिलीफ हॉस्पिटल मारहाण प्रकरणी पालघर पोलीस संशयाच्या भोवऱ्यात,
पालघर रिलीफ हॉस्पिटल मारहाण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे भविष्यात अशा मारहाणीच्या घटनाना पायबंद बसण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळात डॉक्टर्स, कर्मचारी, बिल्डर्स, टोल नाक्यावरील कामगार यांना मारहाण करणाऱ्या तरुणांच्या टोळक्याना अक्षरशः ऊत आला आहे. अशाप्रकारची मारहाण करताना ही टोळकी हॉस्पिटल्स, बिल्डर्सची कार्यालये व टोलनाके फोडत असतात. आपण काहीतरी जगावेगळे करत आहोत, हे समाजाला दाखवण्यासाठी हे सारे उपदव्याप करण्यात येत असतात. त्यासाठी सोबत युट्युबरना आवर्जून सोबत नेत असतात. मात्र डोंबिवली येथे डॉक्टर्स व महिला कर्मचाऱ्यांना व आता पालघर येथे झालेल्या मारहाण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे ही टोळकी आता भयभीत झाली आहेत. या दोन्ही प्रकरणी न्यायालयाने पोलिसांना विविध कलमे लावण्यास भाग पाडल्यामुळे अटकेत असलेल्या आरोपीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. या आरोपीना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांनाही आरोपी करायला हवे. आजवर घडलेल्या अनेक प्रकरणात पोलीस आरोपीना साथ देत आले आहेत. कलमे लावण्यात पोलीस करत असलेल्या चलाखीमुळे आरोपीना त्वरित जामीन मिळतो. तसा तो या दोन प्रकरणातील आरोपीना मिळू नये, म्हणून न्यायालयाने पोलिसांना थेट निर्देश दिले आहेत. त्यामुळे हे आरोपी सध्या जेलमध्ये खितपत पडले आहेत. त्यांना लावण्यात आलेल्या कलमापैकी एका कलमात थेट सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद असल्यामुळे आरोपीचे धाबे दणाणले आहे.
गेल्या ५ सप्टें. रोजी दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या ५ गोविंदाना पालघरच्या रिलीफ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यापैकी तिघे अतिदक्षता विभागात होते. डॉक्टरांनी यावेळी सिटीस्कॅनसाठी २० हजार रु. ची मागणी केली. आयोजकांनी त्यापैकी १० हजार रु. भरले. उर्वरित बिल व डिस्चार्ज देण्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंदन संख्ये, नीलम संख्ये, आ. राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित, साईराज पाटील, राहुल घरत, विकी संख्ये, शुभम बांदिवडेकर व ऋषभ वारे यांनी हॉस्पिटलमध्ये घुसून डॉक्टर व कर्मचारी विवेक झिंगा या दोघांना मारहाण केली. तसेच अतिदक्षता विभागात शिरून तेथे असलेल्या रुग्णांचे सलाईन काढून त्यांना जबरदस्तीने बाहेर काढल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी सर्वात प्रथम शहरप्रमुख राहुल घरत याला अटक करण्यात आली. त्यानंतर त्याच्या पोलीस कोठडीत ४ वेळा वाढ करण्यात आली. रोहित गावित हा मिरा भाईंदर येथे लपला असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला शोधून काढले. न्यायालयाने त्यालाही पोलीस कोठडी दिली. दरम्यान या घटनेची मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. अजय गडकरी व न्या. कमल खाता, यांच्या खंडपीठाने स्वतःहून दखल घेतली. न्यायालयाने या प्रकरणी पालघर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना हजर राहण्याचे आदेश दिले. सुनावणी दरम्यान पोलिसांच्या तपासावर न्यायालयाने ” केवळ दिखाव्याची कारवाई, ” आणि ” हास्यास्पद, ” अशी टीका केली. या प्रकरणात पंचनामा, केस डायरी, सलाईनची बाटली जप्त न करणे व पुरावा गोळा न करणे, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावेळी न्यायालयाने पोलिसांना चांगलाच दट्ट्या दिला, न्यायालय म्हणाले, एफआयआर दाखल होताच ९ आरोपी फरार कसे होतात ? ही तुमची कार्यक्षमता आहे का ? तुमच्याकडून तपास होत नसेल तर आम्ही तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करू. त्यानंतर न्यायालयाने तपासाची जबाबदारी कोकण विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षकाकडे सोपवली. हा सर्व घटनाक्रम लक्षात घेता पालघर जिल्हा पोलीस संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. पुढील सुनावणीत आरोपीना न्यायालयीन कोठडी किंवा जामीन देणे यावर निर्णय होणार आहे.

