दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
१२ उत्सव संपला ; आता प्रतिक्षा आहे १३ व्या उत्सवाची…
गेल्या सहा वर्षातील बारावा उत्सव काल पूर्ण झाला. परदेशात असलेल्या उद्योगमंत्र्यांनी जरांगे यांना एक कॉल केला व जरांगे यांचा राग नाहीसा झाला व त्यांनी सरकारला तीन महिन्याची मुदत दिली व सरकार व जरांगे हे दोघेही निवांत झाले. त्यांच्या या निर्णयाचे मराठ्यांनी किती स्वागत केले, हे मात्र कळू शकले नाही. असो, जरांगे पाटलांच्या बाराव्या उत्सवाची अशाप्रकारे इतिश्री झाली. या सर्व धडामोडीमुळे मराठ्यांचा आरक्षण या विषयावरून आता विश्वास उडत चालला आहे. बिचारे मराठे आजवर आपल्या मुलाबाळांना आरक्षणाचा फायदा मिळेल, त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, अशा भाबड्या आशेतून जरांगे पाटील यांच्यामागे धावत सुटले होते. पण, फडणवीस सरकारने त्यांच्या नाकदुऱ्या अशा काढल्या कि त्यांना प्रत्येक वेळी माघार घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे सुरुवातीला झालेली गर्दी ओसरत गेली.
या सर्व प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शह – प्रतिशहाच्या नाट्यात जरांगे पाटील यांची प्रत्येक वेळी कोंडी केली. सुरुवातीच्या काळात गिरीश महाजन, संदीपन भुमरे,प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, विखे पाटील व आता सामंत यांना त्यांनी आपले दूत म्हणून जरांगे पाटील यांच्याकडे पाठवले. या सर्वांवर फडणवीस यांनी तीन महत्वाची कामे सोपवली होती. १ ) आरक्षण संदर्भात सरकारचा दृष्टिकोन सकारात्मक आहे, हे जरांगे यांच्या मनावर बिंबवणे, २ ) त्यांच्या आरक्षणसंदर्भातील सर्व मागण्या आम्हाला मान्य आहेत, पण ते न्यायालयात टिकण्यासाठी कायदेशीर बाबी तपासायला लागतील, असे आश्वासन देणे, ३ ) त्यांची समजूत काढल्यानंतर त्यांच्या ओठाला सरबतचा ग्लास लावणे, ही तिन्ही कामे फडणवीस यांच्या या दुतांनी प्रामाणिकपणे पार पाडली. असा हा उत्सव बारावा वेळा पार पडला. ऐन गणेशोत्सव सणाच्या काळात मुंबईमध्ये आंदोलन करण्याची भाषा, हे शहाणपणाचे लक्षण नव्हते. पण, मी म्हणेन तसेच व्हायला पाहिजे, असा जो अट्टाहास त्यांनी केला, तो त्यांच्या चांगलाच अंगलट आला. फडणवीस यांच्या गृहविभागाने या प्रकरणी ताठरपणा दाखवत जरांगे यांना परवानगी नाकारली, तेंव्हा त्यांचे विमान बरेचसे खाली आले व त्यांनी ” मी मुंबईत एकटा जाईन,” असे जाहीर केले. पण राजकीय खेळी करण्यात निष्णात असलेल्या मुत्सद्दी फडणवीस यांनी कळ फिरवली व जरांगे यांनी लगबगीने पुन्हा सरकारला तीन महिन्याची मुदत देऊन टाकली. दुसरीकडे फडणवीस यांच्या सुविद्य पत्नी अमृता फडणवीस या देखील नाराज झाल्या, त्यांनी जरांगे पाटील हे माझे भाऊ आहेत, असे जाहीर करून त्यांना घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. बहिणीने आमंत्रण दिले असले तरी चाणाक्ष भावोजी आपले काय करतील, याची मेव्हण्याना कल्पना होती, त्यामुळे त्यांनी थेट तीन महिन्याची मुदतच देऊन टाकली. दरम्यान जरांगे वहिनीने आपल्या नणंदेला भावनात्मक आव्हान केले कि ” वहिनी माझे कुंकू जपा, माझे पती मुंबईत येत आहेत.पण या सर्वाना जरांगे यांनी नाराज केले. तूर्तास जरांगे निवांत झाले आहेत, १३ वा उत्सव पुन्हा आकाराला यायला बराच अवधी आहे. बघूया, काय होते ते…

