दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
” होय,मी,व्हेंटिलेटरवर असलेल्या महानगरपालिकेचा सन्माननिय नागरिक आहे,” …
चार दिवसापूर्वी पावसाने राज्यात सर्वत्र दमदार हजेरी लावली, त्यामुळे ग्रामीण भागातील जनता चांगलीच सुखावली. मात्र शहरी भागातील जनता, मात्र न भूतो न भविष्यती अशा अस्मानी संकटात सापडली. मुंबईपासून अवघ्या तासाच्या अंतरावर असलेल्या नालासोपारा व विरार शहराला अक्षरशः नद्या व तलावाचे स्वरूप आले. येथील नागरिकांच्या डोळ्यांच्या कडा अजूनही ओल्याच आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वी सर्वपक्षीय नेते व मनपा अधिकारी या शहरातील नाले व गटारांची पाहणी करत दावे करत होते. यंदा कोणत्याही परिस्थितीत शहरात पाणी साचून राहणार नाही. त्यांचे हे दावे किती निखालस खोटे होते व कर देणाऱ्या प्रामाणिक करदात्याशी प्रतारणा करणारे होते, हे पुन्हा एकदा अनुभवायला मिळाले. जे वर्षानुवर्षे घडत आले, तेच यंदाही घडणार,अशी नागरिकांना खात्री होती,आणि घडलंही तसच..त्यामुळे आश्चर्य कोणालाच वाटले नाही. कारण,या महानगरपालिकेत वर्षानुवर्षे एकच कार्यक्रम सुरू आहे.तो म्हणजे ” ओरबाडून खाणे,” होय. पण ओरबाडून खाणारे नगरसेवक व अधिकारी या दोघांनी केवळ ओरबाडून खाण्यावर समाधान मानले नाही तर, संपूर्ण व्यवस्थाच पार कुरतुडून टाकली आहे. ती भविष्यात कधीही बाळसं धरू शकणार नाही, आजच्या घडीला तिची अवस्था कुपोषित बालकापेक्षा बत्तर झाली आहे. आज ही महानगरपालिका व्हेंटिलेटवर कशी बशी तग धरून आहे. केवळ शासकीय अनुदानावर तिचा श्वासोच्छवास सुरू आहे. आजवर आलेल्या आयुक्तांनी व्हेंटिलेटरवर पहुडलेल्या कलेवराचे केवळ लचके तोडण्याचे काम केले. त्यामुळे त्यांना अपेक्षित असलेली चौथी मुंबई आकाराला येण्यापूर्वीच तीला खादाड राजकारणी व गिधाडांच्या रुपात वावरणाऱ्या अधिकाऱ्यांनी व्हेंटिलेटरवर पोहोचवली. या प्रक्रियेमध्ये केवळ सत्ताधारी मंडळीच सक्रिय आहेत, असे नाही तर विरोधक देखील सहभागी आहेत. एरवी एकमेकांना पाण्यात बघणारे हे दोघे निवडून आल्यानंतर मात्र ओरबाडून खाण्यासाठी एकमेकांच्या गळ्यात गळा घालून फिरू लागतात. हे गुपित आता लपून राहिलेले नाही. येथे ” सब कुछ बिकता है, सिर्फ खरीदनेवाला चाहीये,” हे आता करदात्यांना देखील कळून चुकले आहे, पण त्या बिचाऱ्यांचा नाईलाज आहे. कारण,ज्याला आपण निवडून देतो, तो पण कालांतराने ओरबाडून खाणाऱ्या गॅंगमध्ये सामील होत असतो. त्यामुळे जे काही चाललंय ते निमूटपणे सहन करण्याशिवाय त्यांच्याकडे अन्य पर्याय नाही. तुमची घरे वाहून गेली, दुकानातील मालमत्ता उध्वस्त झाली, रस्ते वाहून गेले किंवा मॅनहोलमध्ये पडून वाहून गेलात तरी सहन करा, कारण लवकरच चौथी मुंबई आकाराला येणार आहे,आणि ती प्रत्यक्षात आली की तुमच्या मुला बाळाचे भवितव्य फुलवणार आहे आणि त्यांना अभिमानाने सांगता येणार आहे, ” होय मी व्हेंटिलेटर असलेल्या शहराचा सन्माननिय नागरिक आहे,”….

