दीपक मोहिते,
मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
पालघर जिल्ह्यात शेतीची कामे सुरू होईस्तोवर ग्रामीण भागातील आदिवासी विविध क्षेत्रात काम करून रोजगार मिळवत असतो. लाकडाच्या मोळ्या,रानभाज्या व फळे विक्री करून आदिवासी समाज आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.पावसाळ्यानंतर या आदिवासी मजुरांच्या हाताला काम नसते. त्यामुळे तो शहरी भागात स्थलांतर करत असतो.बांधकाम क्षेत्रात बऱ्यापैकी आर्थिक आवक होत असल्यामुळे तो या क्षेत्रात स्थिरावतो. या मजुरांच्या हाताला आपल्या परिसरात काम मिळावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या मनरेगामध्ये अधिकाऱ्यांच्या अनागोंदी व भ्रष्ट कारभारामुळे आदिवासी हल्ली या कामावर यायला तयार नसतात.

ग्रामीण भागातील नागरीक, शेती, मनरेगा व वाड्यावर मजूर म्हणून काम करत दिवसाकाठी २०० ते २५० रु.कमवतात. पावसाळा सुरू झाला कि शेतीची जमीन साफसफाई करणे, मशागत करणे, शेतात बी-बियाणे व खते टाकणे, पावसाला सुरुवात झाली कि लावणी,आवणी व भात तयार झाला कि कापणी व झोडणी अशी कामे ते करत असतात. ही सारी अंगमेहनतीची असून काटक असलेला आदिवासी या क्षेत्रात शेतमजूर बऱ्यापैकी रोजगार मिळवतो. मात्र पावसाळा संपला कि या शेतमजुरासमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकतो. अशावेळी हा मजूर रोजगाराच्या शोधात स्थलांतर करतो. पण अनेक मजूर व त्यांच्या बायका आपल्या परिसरात रस्त्याच्या कड्याला बसून रानभाज्या विकण्याचा व्यवसाय करतात. मोळ्या व रानभाज्या विकणे,यामध्ये दिवसाकाठी १५० ते २०० रु.कमवतात. वर्षानुवर्षे आदिवासी समाज अशा पद्धतीची कामे करून आपल्या कुटुंबाचा दैनंदिन खर्च भागवत असतात. पावसाळा संपला कि मनरेगाची कामे सुरू होतील व आपल्याला काम मिळेल, अशी त्यांची अपेक्षा असते. पण लालफितीच्या कारभारामुळे स्थानिक प्रशासनातील अधिकारी ही कामे वेळेवर सुरू करत नाहीत.आणि सुरू केली तरी त्यांची मजुरी लवकर मिळत नाही. त्यामुळे मनरेगाच्या कामासाठी आता आदिवासी मजूर मिळेनासे झाले आहेत. मनरेगा कामातील बजबजपुरी दूर झाल्यास आदिवासी मजूर शासनाच्या या योजनेवर काम करतील, पण किमान दोन महिने कामाचा मोबदला मिळत नसल्यामुळे हे आदिवासी या कामावर येण्यास तयार होत नाहीत.लवकरच पावसाळा सुरु होणार असल्यामुळे आदिवासी मजूर पुन्हा आपल्या मुळगावी परतू लागले आहेत. यावर्षी तरी आपल्या भातशेतीला सुगीचे दिवस येतील, अशी आशा त्यांना आहे.

