दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
महाराष्ट्राला ” जाणता राजा,” नकोय, तर जागता पहारेकरी,” हवा,
काल राज्याचा वर्धापनदिन आपण मोठ्या उत्साहात साजरा केला. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आपण आणला. त्यासाठी १०५ हुतात्म्यानी आपल्या प्राणाची आहुती दिली व तत्कालीन केंद्र सरकारला लोकभावनेसमोर आपली मान झूकवावी लागली. ज्यानी या राज्याच्या उभारणीसाठी आपले सर्वस्व वेचले, स्वत;च्या संसाराची होळी केली, तो महाराष्ट्र गेल्या सहा दशकाच्या वाटचालीनंतर नेमका कुठे उभा आहे ? याचा शोध घेणे गरजेचे आहे,म्हणून हा लेखप्रपंच…
चला बघूया समकालीन समाजधुरीणानी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणण्यासाठी किती खस्ता खाल्या. २१ नोव्हे. १९५६ रोजी सकाळी फ्लोरा फाउंटन परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आज नक्कीच काही तरी आक्रित घडणार, अशी संशयाची पाल प्रत्येकाच्या मनात चुकचुकत होती. राज्य पुनर्रचना आयोगाने मुंबई महाराष्ट्राला देण्याचे नाकारल्यामुळे मुंबई पेटून उठली होती.” करो वा मरो,” या निर्णयाप्रत आलेले कामगार, सरकारचा निषेध करण्यासाठी फ्लोरा फाउंटन येथे मोर्चा घेवून येणार होते. हा मोर्चा कोणत्याही परिस्थितीत चिरडायचाच,अशा प्रयत्नात त्यावेळचे मोरारजी देसाई यांचे सरकार होते. गिरण्यांची पहिली पाळी सुटल्यानंतर
कामगाराचे जत्थेच्या जत्थे फ्लोरा फॉउंटनच्या दिशेने सरकु लागले. तो फ्लोरा फाऊंटेन येथे पोहोचल्यानंतर पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी जोरदार लाठीहल्ला केला. परंतु जमाव मागे हटत नव्हता. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे, पाहुन मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी गोळीबाराचे आदेश दिले. दिसताक्षणी गोळी घाला, असे आदेश मिळाल्यानंतर पोलीसानी बेछूट गोळीबार सुरु केला. क्षणार्धात संपूर्ण परिसरात रक्ताचा सड़ा पडला. सर्वत्र पळापळ झाली. या संपूर्ण लढ्यात १०५ जण हुतात्मे झाले. अखेर केंद्र सरकार, लोकभावनेसमोर झुकले व १ मे १९६० रोजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यानी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणला.
आज ६६ वर्षाच्या प्रदीर्घ वाटचालीनंतर तशीच स्थिति पुन्हा निर्माण झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे, ती ओळख पुसण्याचे काम
दिल्हीश्वर राज्यकर्ते करत आहेत. केवळ
” गर्जा महाराष्ट्र माझा,” अशा आरोळ्या ठोकुन चालणार नाही. मुंबई तोडण्यासाठी आसूसलेल्या तथाकथित आत्म्याना रोखण्यासाठी पुन्हा तशीच एकजूट महाराष्ट्राच्या जनतेला दाखवावी लागणार आहे.अनेक प्रकल्प शेजारच्या राज्यात नेण्याचे होत असलेले प्रयत्न, हा राज्य आर्थिकदृष्ट्या खिळखीळा करण्याचाच एक भाग आहे. त्यामुळे राज्याला ” जाणता राजा,” ची गरज नसुन ” जागता पहारेकरी,” ची गरज आहे.
मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले असले तरी आज या आर्थिक व नैसर्गिक संसाधनाने परिपूर्ण असलेल्या राज्यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर ही प्रमुख शहरे वगळता उर्वरित ग्रामीण भागाची अवस्था आजही ” जैसे थे, ” स्थितीतच आहे.याला आपले राज्यकर्ते जेवढे जबाबदार आहेत, तेवढेच जबाबदार या नतद्रष्ट नेत्यांना निवडून देणारे आपण मतदारही आहोत. सहा दशकाच्या प्रदीर्घ वाटचालीनंतरही ग्रामीण भागातील महिलांची दोन हंडे पाण्यासाठी वणवण होते, वैद्यकीय उपचारासाठी शहरे गाठावी लागतात, दरवर्षी लाखो आदिवासी मुले कुपोषणामुळे मृत्यूमुखी पडतात, प्राथमिक शाळांना टाळी लागतात, वेठबिगारी आजही कायम आहे, ग्रामीण भागातील दोन वेळचे पोटभर जेवण मिळत नाही, रोजगारासाठी स्थलांतर करावे लागते व लाखाचा पोशिंदा आपल्या शेतातील झाडावर फास लावून घेतो, हे चित्रच मुळी सुजलाम – सुफलाम अशी ओळख असलेल्या आपल्या राज्याचे वास्तव समोर आले आहे. ज्यांच्या हाती राज्याची धुरा सोपवण्यात आली, त्या राज्यकर्त्यांनी या राज्याचे अक्षरशः लचके तोडले.अशा परिस्थितीतही राज्याची जनता ” हे ही दिवस निघून जातील, ” अशी आशा बाळगून आहेत. तो दिवस कधी उजाडेल, हे त्या परमेश्वरालाच माहित…

