दीपक मोहिते,
बॉटमलाईन,
अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
इराण व अमेरिका – इस्त्रायल यांच्यामध्ये सध्या युद्धविराम झाला असला तरी या युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चांगलीच नाचक्की झाली आहे. इराण हा अमेरिकेच्या तुलनेत अतिशय लहान देश असताना त्यांनी अमेरिका व इस्रायलची दादागिरी झुगारून लावली.” आम्ही मरण पत्करू, पण मान झुकवणार नाही,” अशी भूमिका इराणने घेतली व त्यांचा प्रत्येक हल्ला यशस्वीपणे परतवून लावला. इराणने गेल्या काही वर्षात जी काही लष्करी तयारी केली,त्याचा थांगपत्ता त्यांनी अमेरिकेच्या सीआयए व इस्रायलच्या मोसाद या नावाजलेल्या गुप्तहेर संस्थांना लागू दिला नाही.त्यामुळे दोघांचे अतोनात नुकसान झाले.लष्काराच्या वाढीव खर्चासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना आता काँग्रेससमोर जावे लागणार आहे.पण त्यांना स्वतःचा रिपब्लिकन व विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रेटिक पक्षाला सामोरे जावे लागणार आहे. या दोन्ही पक्षाच्या खासदारांनी वाढीव खर्चास मंजुरी देण्यासंदर्भात ताठर भूमिका घेतली आहे.इस्त्रायलच्या आततायीपणाला अमेरिकेने आवर घालायला हवा,असे त्यांचे म्हणणे आहे.दुसऱ्या देशाला मदत करताना आपले सैनिक मृत्युमुखी पडत असल्यामुळे अमेरिकेत ट्रम्प प्रशासनाविरोधात प्रचंड नाराजी आहे.अमेरिकन कायद्यानुसार देशाचा राष्ट्राध्यक्ष केवळ ६० दिवस आपल्या इच्छेनुसार युद्धावर खर्च करू शकतो.त्यानंतर मात्र त्याला वाढीव खर्चासाठी काँग्रेससमोर जावे लागते.या वाढीव खर्चाला काँग्रेसची मंजुरी मिळणार नाही,याची कुणकुण लागल्यामुळे ट्रम्प यांनी एकतर्फी युद्धविरामाची घोषणा केली व त्याला सतत मुदतवाढ देणे सुरू ठेवले आहे.दुसरीकडे इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी जगभरातील देशात दौरे करत सहानुभूती मिळवली.त्यामुळे सध्या अनेक देशात अमेरिका व इस्त्रायलच्या विरोधात बऱ्यापैकी वातावरण निर्माण होऊ शकले.इराणने अमेरिकेची आर्थिक कोंडी करण्यासाठी तेलाची खरेदी – विक्री व्यवहार डॉलर ऐवजी चीनचे चलन युआनमध्ये सुरू केल्यामुळे डॉलर आता कधीही कोसळू शकतो. होर्मुझ खाडीत अमेरिकेने स्वतःचे नाविक दल तैनात करून तेलाची वाहतूक रोखण्याचा प्रयत्न केला. पण इराण,चीन व रशिया या तिघांनी त्यांना दाद दिली नाही. इराणला चर्चेसाठी टेबलावर आणण्याचे अमेरिकेचे प्रयत्न आहेत.पण इराणने सर्वप्रथम आमच्या अटी मान्य करा,मगच चर्चा होईल,अशी भूमिका घेतली आहे.त्यामुळे अमेरिकेच्या दादागिरीला एकप्रकारे चांगलाच पायबंद बसला आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की विनाश हा अटळ असतो.ट्रम्प यांच्या बाबतीत हेच घडत आहे.ट्रम्प विरोधात अमेरिकेत सुमारे ९० लाख अमेरिकन लोक रस्त्यावर उतरले, त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेमध्ये सध्या चांगलीच घसरण झाली आहे.

