दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
गोरगरिबांच्या एसटीला खड्यात घालू नका,
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची एसटी सध्या सुसाट वेगाने धावू लागली आहे.परिवहनमंत्री म्हणून सूत्रे हाती घेताच त्यांनी विविध योजना जाहीर करण्याचा धुमधडाका लावला आहे.नवीन इलेक्ट्रिक बसेस खरेदी,६३ बस आगारांचा त्रिकुट पद्धतीने विकास,पालघर येथे आधुनिक पद्धतीचे बस टर्मिनल,आदीचा त्यामध्ये समावेश आहे.मात्र त्याचवेळी एसटी कर्मचाऱ्यांचे मार्च महिन्याचे वेतन केवळ ५६ % च मिळणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.त्यामुळे पैसा नसताना परिवहनमंत्री योजना जाहीर कशा करतात ? असा प्रश्न सर्वसामान्यजनासमोर उभा ठाकला आहे.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी काल अर्थखात्याच्या कारभारावर सडकून टीका केली.महिला व ज्येष्ठ नागरिकासाठी देण्यात आलेल्या ५० % सवलतीमुळे एसटीची आर्थिक घडी पार विस्कळीत झाली आहे.या सवलतीच्या बदल्यात सरकारकडून मिळणाऱ्या प्रतिपूर्तीच्या रकमा अर्थखात्याकडून लवकर मिळत नसल्यामुळे एसटीच्या तिजोरीत खडखडाट निर्माण झाला आहे.त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन सतत रखडत चालले आहे.एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी परीवहनमंत्र्यानी आता शिवधनुष्य उचलले आहे.हे शिवधनुष्य ते कसे पेलवणार,हे त्यांनाही माहीत नाही.पण त्यांची कावळ्याची नजर एसटी महामंडळाच्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जमिनीवर गेली आहे व त्या जागाच्या विक्रीतून निधी उभारण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे.हा
उपाय म्हणजे एसटी सेवेला अधिक खड्यात घालण्याचा प्रकार आहे.कर्मचाऱ्यांचे हक्काचे वेतन महामंडळ देऊ शकत नाही,अशावेळी परिवहनमंत्री पंधरा ते वीस हजार इलेक्ट्रिक बसेस खरेदी करण्यास निघाले आहेत.मोक्याच्या ठिकाणी असलेल्या या जमिनी बिल्डरांच्या घश्यात टाकण्याचे हे षडयंत्र आहे,परिवहनमंत्री स्वतः बिल्डर असून त्यांना त्या जमिनी किती मौल्यवान आहे,ते त्यांना माहीत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा लुटीचा धंदा त्वरीत रोखावा, अन्यथा एसटी सेवा पूर्णपणे खड्यात जाण्याची शक्यता आहे.

