दीपक मोहिते,
” केवळ कोडगेपणा,”
मंत्र्यांच्या संवेदना स्मशानातील सरणावर जळून केंव्हाच खाक झाल्या आहेत….
राज्यात असलेल्या महायुतीच्या असंवेदनशील सरकारकडून शेतकऱ्यांची वारंवार क्रूर चेष्टा करण्यात येत आहे.शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यावरून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आठवड्यापूर्वी घुमजाव केले असताना दोन दिवसांपूर्वी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांना विचारतात की सरकार तुमच्या प्रत्येक कामासाठी पैसे देत असताना,तुम्हाला कर्जमाफीच्या पैश्यातून आपल्या मुला- मुलींची लग्ने का करावीशी वाटतात ? हा निव्वळ कोडगेपणाच नाहीतर निर्लज्जपणा देखील आहे.
महायुतीच्या असंवेदनशील सरकारमध्ये बिनडोक व ज्यांच्या संवेदना मेल्या आहेत,असे अनेक मंत्री आहेत.ऐन निवडणुकीच्या तोंडावर तीन इंजिनच्या सरकारने ” आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊ,” असे जाहीर आश्वासन दिले होते.वास्तविक राज्यावर ९ लाख कोटी रु.कर्ज असताना ” लाडकी बहीण व कर्जमाफी,” या दोन्ही योजना,परवडणाऱ्या नव्हत्या.पण मतासाठी या सरकारने अशाप्रकारची खोटी जाहीर आश्वासने दिली.लाडकी बहीण योजनेचे चार हप्ते देण्यात आले.पुढील हप्ता देताना सरकारची आता तंतरायला लागली आहे.त्यामुळे सरकारने आता लाभार्थी महिलांच्या संख्येला कात्री लावण्याचे सत्र सुरू केले आहे.निरनिराळ्या अटी व शर्ती लागू करून लाभार्थी महिलांची संख्या १० लाखाने खाली आणली.येणाऱ्या काळात लाडकी बहीण योजना किती तग धरेल,हे सांगणे कठीणच आहे.कारण राज्याची तिजोरीमध्ये खडखडाट निर्माण झाला असून महसूल वाढवण्यासाठी सरकार दारूचे परवाने मुक्त हस्ते वाटप करण्याच्या तयारीला लागले आहे.
गेल्या आठवड्यात काही शेतकऱ्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांना आमच्या कर्जमाफीचे काय झाले ? अशी विचारणा केली असता,” त्यांनी मी कर्जमाफी संदर्भात कधीही बोललो नाही,माझे एक तरी भाषण दाखवा,ज्यामध्ये कर्जमाफीचा मी उल्लेख केला आहे.” ठीक आहे,तुम्ही तुमच्या भाषणात बोलला नसाल,पण देवेंद्र फडणवीस,एकनाथ शिंदे व तुम्ही,अशा तिघांनी पत्रकार परिषद घेऊन ” आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देऊ,” असे जाहीर केले होते.ते मग काय होते ?
या घडामोडी घडत असताना बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात एका तरुण शेतकऱ्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.प्रवीण खोकले ( २५ ) असे या तरुण शेतकऱ्याचे नाव असून शेतीची नापिकी,आपल्या वडिलांच्या नावावर एका राष्ट्रीय बँकेचे असलेले दोन लाख रु.चे कर्ज फेडता येता नाही,आपल्या लहान भावाचे शिक्षण सुरू ठेवणे शक्य होत नाही,अशा कारणामुळे या तरुणाला नैराश्य आले होते.त्यामुळे त्याने आठ दिवसापूर्वी घरदार सोडले होते.शोधाशोध सुरू झाल्यानंतर जवळच असलेल्या विहिरीतील पाण्यात प्रवीणचा मृतदेह तरंगत होता.अशावेळी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांना विचारतात की ” सरकार प्रत्येक कामासाठी तुम्हाला सरकार पैसे देत असताना,तुम्हाला कर्जमाफी कशाला हवी ?” यावरून आपण लक्षात घेतले पाहिजे की हे सरकार तुमच्या – आमच्या हिताचे सरकार नाही.तर ते एक असंवेदनशील सरकार असून या सरकारमधील प्रत्येक मंत्र्यांच्या संवेदना स्मशानातील सरणावर केंव्हाच जळून खाक झाल्या आहेत.

