दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
आधी पकडा आणि मग कोकला ” याला सोडणार नाही,त्याला सोडणार नाही,”
छत्रपती शिवाजी महाराजांवर टीका करून मुस्लिम देशात पळून जाणे,याला आपण नवा हिंदुत्ववाद म्हणायचे का ? राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ दररोज ” याला सोडणार नाही,त्याला सोडणार नाही,” अशा सिंहगर्जना करताना पाहायला मिळतात.त्यांच्या नाकावर टिच्चून प्रशांत कोरटकर दुबईला पळून गेला.देवभाऊनी एक लक्षात घ्यायला हवे की ” याला सोडणार नाही,त्याला सोडणार नाही,” हे म्हणायला सोपे आहे.पण त्यांना सोडायला, सर्वप्रथम पकडा तरी…
संतोष देशमुख यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी हा देवाभाऊच्या पोलिसांना गेल्या चार महिन्यापासून सापडत नाही आणि भाऊ ” सोडणार नाही,” ची भाषा करत फिरत आहेत.नागपूर येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलीस आता अलर्ट मोडवर आले आहे.हा जो हिंसाचार देवाभाऊच्या होमग्राऊंडवर झाला आहे,त्यामागे देवभाऊंच्या पक्षातील काही असंतुष्ट आत्मे असावेत,असा संशय आता व्यक्त करण्यात येत आहे.देवाभाऊला बदनाम करण्यासाठी पक्षांतर्गत असलेल्या काही शक्ती सक्रिय झाल्याचे सांगण्यात येत आहे.मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्यांच्या घरानजीक अशाप्रकारचा हिंसाचार होतो.तो बाह्य शक्ती करू शकेल असे वाटत नाही.त्यामुळे या हिंसाचाराची कसून चौकशी झाली पाहिजे. यामागे नक्की कोणत्या शक्ती सक्रिय होत्या,हे लोकांसमोर आले पाहिजे आणि ते हुडकून काढण्याची जबाबदारी राज्याचे गृहमंत्री म्हणून देवाभाउंची आहे.तसेच प्रशांत कोरटकर याचा पासपोर्ट सापडतो,पण कोरटकर सापडत नाही.त्याला देशाबाहेर जाण्यासाठी कोणी मदत केली,हे पण लोकांना कळायला हवं.केवळ ” याला सोडणार नाही,त्याला सोडणार नाही,” असे कोकलत भुई धोपटत राहू नका,एवढंच देवाभाऊंना सांगणं आहे.

