दीपक मोहिते,
बाबर ते औरंगजेबाची कबर, हा प्रवास पुन्हा सुरु होणे, आपल्याला परवडणारे नाही…
महाराष्ट्रात औरंगाजेबाच्या कबरीवरून गेल्या काही दिवसापासून प्रचंड गदारोळ उठला आहे.हा प्रश्न नेमका आताच उकरून काढण्यात का आला.या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.चारशे वर्षांपूर्वी कबरीत गेलेल्या आलमगीर औरंगजेबावरून नागपूर सारख्या सुशिक्षित शहरामध्ये राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला काळे फासणाऱ्या समाजविघातक शक्ती कोण आहेत.यावर विचारमंथन होण्याची गरज आहे.त्यासाठी दोन्ही बाजू समोर आणण्याचा हा प्रयत्न आहे.
संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे असलेल्या त्या कबरीची पुजा होते,तिच्यावर चादर चढवली जाते आणि तिच्यावर गुलाबाची फुले वाहिली जातात,ही खरी समस्या आहे.औरंगजेब फक्त हिंदवी स्वराज्याचा वैरी नव्हता,तर तो हिंदुचाही वैरी होता.इतिहास चाळून पाहिला तर ते आपल्याला पावलोपावली जाणवते.पण काहीजण त्याचे गोडवे गातात.त्याच्या कबरीवर डोके टेकायला जातात,हिंदुत्ववाद्यांची ही खरी समस्या आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठ्या साम्राज्याचा बादशहा हा एका छोट्या हिंदवी स्वराज्याला संपवायला,नष्ट करायला आपले ऐशो आरामाचे जीवन सोडून उतार वयात मोठ्या सैनिकी सामर्थ्यानिशी दक्षिणेत उतरतो.कारण त्याला त्या छोट्याशा हिंदवी स्वराज्यात हिंदु साम्राज्याची झलक दिसली होती.त्याला भविष्यातील इस्लामी साम्राज्याचे पतन आणि हिंदु साम्राज्याचा उदय दिसला म्हणून तो हिंदुची शेवटची आशा,शेवटचा आवाज दडपायला,ठार मारायला आला होता.विचार करा,औरंगजेबाने मराठ्यांनी सुरू केलेल्या हिंदुपतपादशाहीचे कंबरडे मोडले असते तर,आज आपली नव्हे संपुर्ण देशाची काय अवस्था झाली असती ? या राष्ट्राला इस्लामी करायला निघालेला औरंगजेब आज कोणालातरी आदर्श वाटत आहे.ही खरी समस्या आहे.
औरंगजेब छत्रपतींचा शत्रु आहे ? पण छत्रपतींचा शत्रु का आहे ? कारण छत्रपतींनी इस्लामने मोडलेल्या हिंदुपतपादशाहीची रायगडावर पुन्हा स्थापना केली होती. छत्रपतींनी हिंदु समाज व हिंदु धर्मासाठी हिंदवी स्वराज्य निर्माण केले म्हणून औरंगजेब पूर्ण ताकदीनीशी महाराष्ट्राच्या मुलुखमैदानात उतरला.हे इतकं स्पष्ट असताना आपण शत्रुचे गुणगाण का गायचे ? असेल औरंगजेब पराक्रमी म्हणून तो आपला आदर्श होवू शकतो का ? रावण पण पराक्रमी होता,दुर्योधन,मिर्झाराजा जयसिंह हे दोघे पराक्रमी होते,म्हणून ते आपले आदर्श आहेत का ? आदर्श हे फक्त पराक्रमावर ठरत नसतात.त्यासोबत त्यांच्याकडे चारित्र्य आणि नितीमत्ताही असायला हवी.औरंगजेब सोडाच इतर कोणत्याही इस्लामी शासकाकडे ती नव्हती,खरी समस्या ही आहे.
मान्य आहे औरंगजेबाची कबर ठेवली पाहिजे.पण तीला शत्रुची कबर म्हणूनच ठेवली पाहिजे. त्याला कोणी जर इस्लामचा अनुयायी,सुफी म्हणून पुजत असेल तर पर्यायाने तो आमच्या शत्रुला पुजत आहे,असे समजले पाहिजे.औरंगजेब जर तुम्हाला इस्लामचा सच्चा अनुयायी वाटत असेल तर औरंगजेबाने जे हिंदुसोबत केले ते त्याला इस्लामनेच करायला लावले, हे मान्य करावेच लागेल.ते मान्य करत नाहीत आणि औरंगजेबाला भजायचेही सोडत नाहीत,ही खरी समस्या ही आहे.ही झाली एक बाजू, आता आपल्याला दुसरी बाजू देखील पाहायला हवी.
औरंगजेबाची ही ऐतिहासिक कबर संभाजीनगरपासून चौदा मैल्यावर असलेल्या खुलताबाद येथे आहे.या औरंगजेबाने अतिशय कमी काळात राज्याचा अफाट भुभाग व्यापला.परंतु त्याच्या या साम्राज्याला मराठ्यांनी सुरुंग लावला.या राज्यात इस्लामचा भरभक्कम पाया रोवण्यासाठी आलेल्या औरंगजेबाला येथील मातीत चिरनिद्रा घ्यावी लागली. औरंगजेब हा धर्मांध व सत्तापिपासू होता.त्याने आपल्या जन्मदात्या बापाला कैद केले व स्वतःच्या तीन भावांना ठार मारले.तो क्रूर होता,हे कोणालाही नाकारता येणार नाही.दहा दशकापूर्वीच्या इतिहासात डोकावल्यास त्याचा क्रूरपणा पावलोपावली पाहायला मिळतो.त्याचे गुजरातच्या हिराबाईवर निस्सीम प्रेम होते. आज दिल्लीचे तख्त गुजराती राज्यकर्त्यांच्या हाती आहे.त्यांच्या समर्थकांना औरंगजेबाची कबर उखडायची आहे.ही कबर उखडून त्यांना नेमके काय साध्य करायचे आहे,हे आजच्या घडीला कळायला मार्ग नाही.गुजरातच्या दाहोद येथे ३ नोव्हें.१६१८ रोजी औरंगजेबाचा जन्म झाला.त्यानंतर तो दिल्लीत गेला,तेथून त्याने महाराष्ट्र काबीज करण्यासाठी कंबर कसली,पण मराठ्यांनी महाराष्ट्राच्या मातीत त्याची कबर खोदली.सुमारे दहा दशकानंतर या कबरीवरून आता समाज विस्कळीत करण्याचे प्रयत्न होत असतील तर ते विनाशाला आमंत्रण देणारे ठरणार आहे. ” बाबर ते औरंगजेबाची कबर,” हा जो जीवघेणा प्रवास,पुन्हा सुरु झाला आहे,तो आपल्याला परवडणारा नाही.धर्मांध शक्तीच्या आधारे समाज विस्कळीत करून एकवेळ सत्ता टिकवू शकाल,पण ती कायमस्वरूपी नसेल.

