दीपक मोहिते,
परमेश्वरा,पुन्हा असे अस्मानी संकट नको रे बाबा…
पाच वर्षांपूर्वी २२ मार्च रोजी जीवघेण्या कोरोनाचे आपल्या देशात आगमन झाले. सुरुवातीस या कोरोनाने चीन या देशात धुमाकूळ घातला होता.त्यावेळी या आजाराच्या भीषणतेची जगाला कल्पना पुसटशी कल्पना नव्हती.पण अवघ्या काही दिवसात या आजाराची जगाला भीषणता जाणवू लागली.या आजाराच्या जिवाणूची उत्पत्ती कशी व कोठून झाली,याविषयी कोणतीही माहिती त्यावेळी कोणालाही नव्हती.त्यामुळे सारे जग चिंतेत सापडले होते.कालांतराने या आजाराच्या जिवाणूची निर्मिती चीनच्या वूहान या शहरातील एका लॅबमध्ये झाली हे उघड झाले.त्यानंतर जगातील सारे देश यावर उपाय करण्याच्या कामाला लागले. मात्र ज्या वेगाने फैलाव होत होता,तो रोखणे एकाही देशाला शक्य होत नव्हते. ” एकमेकांशी होणारा संपर्क,” टाळणे,हाच एकमेव उपाय असल्याचे उमगल्यानंतर जगाने ” लॉकडाऊन,” ही संकल्पना स्विकारली आणि संपूर्ण जग स्तब्ध झाले.दैनंदिन व्यवहार ठप्प झाले,उद्योगधंद्यात स्मशान शांतता निर्माण झाले.रस्त्यावर शुकशुकाट झाला.लोकांनी स्वतःला घरात कोंडून घेतले. संपूर्ण जग बंदिवासात गेले.

सुरुवातीच्या काळात वर्षभर संपूर्ण जगाने कसेबसे वर्ष काढले.दरम्यान कोट्यवधी नागरिक मृत्यूमुखी पडले. आजाराची तीव्रता काहीशी कमी झाली होती,पण समूळ नायनाट होऊ शकला नाही. एकीकडे लोक मरणाच्या दारात असताना वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी मात्र मड्याच्या टाळूवरील लोणी खाण्याचे व माणुसकीला काळे फासणारे काम सुरु केले. त्यामुळे नागरिक अशा बिकट परिस्थितीत दुहेरी संकटात सापडले.एकवेळच्या जेवणाचे वांदे,पैशाची आवक थांबलेली तर दुसरीकडे उपचाराच्या नावाखाली होणारी प्रचंड लूट अशा दुष्टचक्रात सापडलेले नागरिक जीव मुठीत धरून कसेबसे जगत होते.त्यानंतर या आजारावर लस शोधण्यात अनेक देशांना यश आले व आजाराची तीव्रता काही प्रमाणात कमी होत गेली.दोन ते सव्वा दोन वर्षे मृत्यूच्या छायेत वावरणारे जग हळूहळू पूर्वपदावर आले.पण या काळात अनेक देशाची अर्थव्यवस्था ढासळत गेली.अजूनही काही देश स्वतःला सावरू शकले नाहीत.
लॉकडाऊनच्या जोरावर कोरोनाच्या या अस्मानी संकटाला आपण भारतीय नागरिक ज्या एकजुटीने संयम राखून सामोरे गेलो,त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच…
राष्ट्रीय संकटाच्या वेळी आपण सारे भारतीय जात-पात,धर्म व राजकारण,यास बाजूला सारून एकत्र येतो व मुकाबला करतो..याची पुन्हा एकदा आठवण झाली.१९७१ साली भारत-पाक युद्धाच्या वेळी अशीच एकजूट आम्ही अनुभवली होती.त्यावेळी
शत्रूराष्ट्रांशी युद्ध होते,त्यामुळे प्रत्येक भारतीय नागरिक राष्ट्रप्रेमाने भारावून गेला होता,यावेळी मात्र एका विलक्षण संकटाला ” नो एन्ट्री,” सांगण्यासाठी आपण संपूर्ण ताकद पणाला लावली होती.सरकारचे उत्कृष्ट नियोजन व रयतेचे सहकार्य,संयम,याचा सुंदर मिलाफ, ” जनता कर्फ्यु,” च्या निमित्ताने आपल्याला पहावयास मिळाला.चीन,इटली,इराण व अन्य काही देशात या कोरोनाने,होत्याचे नव्हते केले.त्या अनुभवावरून आपले सरकार व संबंधित साऱ्या यंत्रणा वेळीच सक्रिय झाल्या व विविध स्तरावर उपाययोजना करण्यात आल्या.त्यामुळे या जीवघेण्या विषाणूचा प्रसार नियंत्रणात राखण्यात आपण काही अंशी यशस्वी होऊ शकलो.
” गो करोना,” हे घोषवाक्य आपण विविध उपाययोजना करत यशस्वी झालो.पण कोट्यवधी नागरिकांना या अस्मानी संकटात आपले जीव गमवावे लागले,हे शल्य मात्र आपण कदापि विसरू शकणार नाही.

