दिपक मोहिते,
लोकांच्या डोळ्यात आणखी किती धुळफेक कराल ?
आग्रा येथे शिवस्मारक व संग्राहालय : देवाभाऊ,” अजब तूझे सरकार,”
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवजयंती दिनी,आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.अर्थात त्यांच्या या घोषणेचे राज्यातील शिवप्रेमी जनता नक्कीच स्वागत करेल. पण आठ वर्षांपूर्वी २४ डिसें. २०१६ रोजी ३ हजार ५०० कोटी रु खर्च करून अरबी समुद्रात उभे करण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जलपूजन झाले होते. त्या स्मारकाची गेल्या आठ वर्षात साधी एक वीट लागली नाही.तसेच मालवण येथील राजकोट किल्यात अत्यंत घिसाडघाईने उभारण्यात आलेला पुतळा कोसळतो.या दुर्घटनेस कोण कारणीभूत आहे.अननुभवी शिल्पकाराला पुतळ्याचे बांधकाम ठेका देणारे झारीतील शुक्राचार्य व लोकप्रतिनिधी कोण होता.या दोन्ही विषयी आपले मुख्यमंत्री देवाभाऊ मूग गिळून बसले आहेत.या प्रश्नाची उत्तरे देण्याऐवजी आता हे देवाभाऊ आग्रा येथे महाराजांचे स्मारक व संग्राहालय उभारणार आहेत.त्यांच्या या बेगडी शिवप्रेमाला त्रिवार वंदन..
चालू अधिवेशनात अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात आग्र्यातील भव्य स्मारकासाठी भरीव तरतूद करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. आता,आग्र्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत महाराष्ट्र शासनाचा,शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.या स्मारकाच्या उभारणी कार्य व निधीची जबाबदारी राज्याच्या पर्यटन विभागाकडे देण्यात आली आहे.त्यासाठी आवश्यक असलेला शासन निर्णय काल निर्गमित करण्यात आला आहे.या निर्णयामुळे भव्य स्मारकाच्या उभारणीस येत्या काळात गती मिळण्याची शक्यता आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यातील ज्या ठिकाणी कैदेत होते,ती जागा महाराष्ट्र सरकार उत्तर प्रदेश सरकारकडून घेणार आहे.या जागेवर शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारले जाणार असून आग्र्यातील शिवरायांची गाथा सांगणारे संग्रहालयही उभारण्यात येणार आहे.राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून स्मारकासाठी आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे.
हे स्मारक उभारणीसाठी पर्यटनमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली इतिहास तज्ज्ञ तसेच जाणकार,तज्ज्ञांची समिती स्वतंत्रपणे स्थापन करण्यात येणार आहे.या प्रकल्पासाठी निधीची उपलब्धता,जमीन अधिग्रहण व अनुषंगिक बाबींची जबाबदारी पर्यटन विभागाकडे सोपवण्यात आली आहे.या विभागातंर्गत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सक्षम यंत्रणा म्हणून काम पाहणार आहे.छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांची आग्र्यातून सुटका आणि महाराजांच्या पराक्रमाच्या गौरवगाथेचे स्मरण पुढील पिढ्यांसाठी करून देण्यासाठी हे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या शौर्य स्मारकामध्ये महाराजांचा जाज्वल्य इतिहास दाखवण्यात येणार आहे.त्यासाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त असे उपक्रम, संग्रहालय,दृकश्राव्य कार्यक्रम, माहितीपट आदी राबवण्यात येणार आहेत.
देशभरातील पर्यटकांसाठी हे स्मारक प्रेरणास्थान बनेल, असे सरकारचे म्हणणे आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळराजे शंभुराजे यांना मावळ्यासह मुघलशाहीने कपटाने नजरकैदेत ठेवले होते.परंतु आपले चातुर्य आणि पराक्रमाने महाराजांनी नजरकैदेतून स्वतःसह शंभुराजे आणि सर्व मावळ्यांची सुटका करून घेतली होती.या ऐतिहासिक आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असलेल्या घटनेबाबात मराठीच नव्हे तर इतिहासप्रेमी पर्यटकांत प्रचंड औत्सुक्य असते.आग्रा येथे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नजरकैदेत राहीले,त्या ठिकाणी आवर्जून जाण्याचा प्रयत्न पर्यटक करत असतात.मात्र,या ठिकाणी कोणतीही ऐतिहासिक बाब, स्मारक,संग्रहालय नसल्यामुळे पर्यटकांना या जाज्वल्य इतिहासाची माहिती मिळत नाही.महाराष्ट्राच्या बाहेर अशाप्रकारचा अत्यंत दुर्मिळ असा केलेला पराक्रम ही इतिहासातील अत्यंत महनीय आणि अभ्यासपूर्ण बाब आहे. अशा स्थळासाठी आणि त्या दैदिप्यमान इतिहासाचे उदात्तीकरण आणि तो वारसा पुढच्या पिढ्यांकडे कायम रहावा,ते स्थळ,त्या वारशाचे जतन,सवंर्धन आणि विकास करण्यासाठी शासनाने इतर राज्यातील अशी स्थळे सुध्दा विकसित करण्याचा जाणीवपूर्वक विचार केला आहे.पण हे सारे घडत असताना अरबी समुद्रातील रखडलेले शिवस्मारक व मालवण-राजकोट किल्यातील पुतळ्याचे कोसळणे,या दोन घटनामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री देवाभाऊंनी दिली पाहिजेत, असे राज्यातील रयतेला वाटते.

