दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
अधिवेशनात सध्या चाललंय तरी काय ?
राज्याचे अधिवेशन आता संपत आले आहे,मात्र या अधिवेशनात किती कामकाज झाले ? हा एक संशोधनाचा विषय ठरला आहे.दररोज होणारा गोंधळ,आरोप-
प्रत्यारोपाचा गदारोळ इ.कारणामुळे प्रत्यक्षात किती विषयावर चर्चा झाली हे सांगणे कठीण आहे.सत्ताधारी पक्ष हा महागाई,कायदा व सुव्यवस्थेची ढासळती स्थिती,ग्रामीण भागातील जनतेचे मूलभूत प्रश्न व शेतकऱ्यांच्या आत्महत्या इ.प्रश्नावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी विविध हातखंडे वापरत आहे.सत्ताधारी पक्षाची ही चाल ओळखून विरोधी पक्षानी वागायला हवे,पण तसे होताना पाहायला मिळत नाही.विरोधी पक्ष हा सत्ताधारी पक्षाच्या सापळ्यात अडकत आहे.
ऍक्शनवर रिऍक्शनच्या या खेळात राज्याचे मात्र अपरिमित नुकसान होत आहे.अधिवेशनाचा एका दिवसाचा खर्च कोटी रु.च्या घरात होत असतो,पण लोकांच्या जीवनाशी निगडित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक होते का ? ” तर नाही,” असंच उत्तर द्यावे लागते.लक्षवेधी प्रश्न विचारण्यासाठी पैसे मोजावे लागतात,असा सनसनाटी आरोप सत्ताधारी पक्षाच्या आमदारानेच केला,त्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा,असा प्रश्न उपस्थित होतो.वास्तविक लक्षवेधी व तारांकित हे दोन्ही प्रश्न हे विरोधी पक्षांनी वापरायची आयुधे आहेत.पण या अधिवेशनात सर्वाधिक लक्षवेधी प्रश्न सत्ताधारी पक्षांनी विचारले,त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्यात आले.त्यामुळे एरवी शांतपणे वागणारे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व शिवसेना नेते आ.अनिल परब या दोघांनीही सभागृहात सरकारवर जोरदार हल्ला चढवला.विरोधकांनी लक्षवेधी प्रश्न विचारायचे व त्या प्रश्नांना संबधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्तरे द्यायची,अशी प्रथा आहे.पण गेल्या काही अधिवेशनापासून महायुती सरकारने ही प्रथा मोडीत काढली आहे.अधिकारीवर्ग देखील या प्रकरणी सत्ताधारी पक्षाच्या आमदाराकडून येणाऱ्या प्रश्नांना प्राधान्य देत असल्यामुळे विरोधकांचे प्रश्न दाबले जात आहेत.त्यामुळे दानवे व परब या दोघांनी सरकारला चांगलेच खडे बोल सुनावले.
दुसरीकडे देशमुख,सूर्यवंशी यांच्या हत्या,औरंगजेबाची कबर,नागपूर हिंसाचार,शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या,आदी प्रश्नावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी सत्ताधारी पक्ष सतत प्रयत्नात आहे.आता त्यांनी दिशा सालीयन मृत्यू प्रकरण पुन्हा उकरून काढले आहे.सध्या हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे.याप्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण ( सीबीआय ) राज्याचे विशेष तपास ( एसआयटी ) पथकाने चौकशी केली.ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असताना तसेच प्रकरण न्यायालयात असताना तब्बल पाच वर्षानंतर दिशा सालीयन हीच्या पालकांनी याचिका दाखल करत आदित्य व उद्धव ठाकरे यांना आरोपी करण्यात यावी,अशी मागणी करणारी याचिका दाखल केल्यामुळे पुन्हा वातावरण तापू लागले आहे.काल अधिवेशनात गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.आजवर या प्रकरणी मौन बाळगणारे दिशा सालियन हीच्या आईवडिलांना अचानक याचिका दाखल करावी,असे वाटणे.हे सारे आश्चर्यजनकच आहे. न्यायालयानेही आता याप्रकरणी जलदगतीने सुनावणी घेऊन या प्रकरणाचा एकदाचा सोक्षमोक्ष लावणे गरजेचे आहे.

