दीपक मोहिते,
” उपरती,”
हर्ष सेन मृत्यूप्रकरणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा..
वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासन किती मुर्दाड आहे,हे त्यानी नुकत्याच घेतलेल्या एका निर्णयावरून अधोरेखित झाले आहे.काल त्यांनी महानगरपालिका क्षेत्रात असलेल्या खेळाच्या मैदानावर व्यवसायिक कार्यक्रमांना परवानगी देणार नाही,असा निर्णय जाहीर केला.हा निर्णय स्तुत्य असला तरी त्यासाठी एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला,याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
चार दिवसापूर्वी वसई पूर्वेस एव्हरशाइन सिटी येथे असलेल्या खेळाच्या मैदानावर आयोजित एका कार्यक्रमात हर्ष सेन नावाचा तरुण वीजेचा झटका बसून मृत्यूमुखी पडला.या घटनेला जबाबदार असलेला आयोजक,ठेकेदार व संबधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विविध राजकीय पक्षांनी पोलिसांकडे केली.त्यानंतर महानगरपालिकेचे अधिकारी खडबडून जागे झाले व त्यांनी यापुढे खेळाच्या मैदानावर व्यवसायिक उपक्रमांना परवानगी दिली जाणार नाही,अशा आशयाचे पत्रक प्रसिद्धीस दिले.महानगरपालिकेच्या आयुक्तांना हा निर्णय घेण्यासाठी हर्ष सेन या तरुणांचा बळी जाईपर्यंत वाट पहावी लागली,ही खऱ्या अर्थाने शोकांतिका आहे.या अशा कार्यक्रमांना वीजजोडणी व अन्य सुविधा देताना कोणते निकष लावण्यात येतात,हे स्पष्ट व्हायला हवे.वसईत महानगरपालिकेच्या मालकीची असंख्य मैदाने आहेत,या खेळाच्या मैदानावर फनफेअर,विविध प्रकारचे महोत्सव जत्रा,फटाक्याची दुकाने व इतर मनोरंजनाचे कार्यक्रम सर्रास होत असतात.त्यासाठी उभारण्यात येणाऱ्या तात्पुरत्या बांधकामामध्ये ठेकेदार सूरक्षिततेचे सारे नियम धाब्यावर बसवत असतात.अशा बांधकामाची साधी तपासणी महानगरपालिका व संबंधित विभागाकडून होत नाही.त्यामुळे हर्ष सेन सारख्या तरुणांना आपले प्राण गमवावे लागतात.याप्रकरणी पोलिसांनी महानगरपालिकेचे अधिकारी,स्थानिक प्रभाग समितीचा प्रभारी आयुक्त व ठेकेदार या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा केला पाहीजे,अशी मागणी होत आहे.हर्ष सेन हा उमदा तरुण मृत्युमुखी पडल्यानंतर आयुक्त जागे होतात,हे ही नसे थोडके…

