दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
फडणवीस सरकारने नैतिक जबाबदारी स्विकारून पायउतार व्हावे,
दोन दिवसापूर्वी झालेल्या दंगलीनंतर आता नागपूर शहर तणावपूर्ण शांतता असली तरी परिस्थिती नियंत्रणात आहे.पोलिसांनी आता दंगलखोरांचे अटकसत्र सुरू केले आहे.या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या दंगलीमागे ” सुनियोजित पॅटर्न,” असल्याचे म्हंटले आहे.त्यामुळे ही दंगल घडवून आणण्यामागे असलेले ” सुनियोजित पॅटर्न,” अमलात आणणारे कोण आहेत,हे हुडकून काढण्याची जबाबदारी ही त्यांच्याच सरकारची आहे,ती त्यांनी टाळता कामा नये.दरम्यान शहरातील तणावाचे वातावरण झपाट्याने निवळत आहे,ही बाब नक्कीच दिलासा देणारी आहे.पण या घटनेने या सरकारची विश्वासार्हता पार रसातळाला गेली आहे.महाराष्ट्राच्या गेल्या ६५ वर्षीच्या वाटचालीला काळिमा घडणारी ही घटना असून मुख्यमंत्री व गृहमंत्री असलेल्या फडणवीस यांनी आपल्या पदावरून पायउतार झाले पाहिजे.पण तसे घडणार नाही.
गेल्या काही वर्षात आपल्या पुरोगामी राज्याची वाटचाल आता ” बाबर ते कबर,” अशी सुरू झाली आहे.ही वाटचाल आपल्याला कुठे नेऊन ठेवणार आहे,हे सत्ताधारी व विरोधकांनी लक्षात घेतले पाहिजे.दोन दिवसांपूर्वी झालेल्या हिंसाचारात अनेक पोलीस गंभीर जखमी झाले,सार्वजनिक मालमत्तेचे अपरिमित नुकसान झाले,शेकडो कुटुंबीय आठ ते दहा तास आपल्या घरात जीव मुठीत धरून लपून बसले होते.महिला आक्रोश करत होत्या,पण पोलीस उशिराने घटनास्थळी पोहोचले. तोवर दंगलखोरांनी आपलं उद्दिष्ट साध्य केले होते.या सर्व घडामोडी पोलीस,गुन्हे अन्वेषण विभाग म्हणजेच गृहविभागाचे अपयश आहे.या हिंसाचारामागे ” सुनियोजित पॅटर्न,” असेल तर आपल्या यंत्रणांना त्याचा सुगावा का लागला नाही.यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत खुलासा करणे गरजेचे आहे.जे सरकार,लोकांचे जीवन सुरक्षित राखू शकत नाही,सार्वजनिक मालमत्तेची राखण करू शकत नाही,सतत बलात्काराच्या घटना घडत आहेत,सकाळी घराबाहेर पडलेल्या मुली संध्याकाळी घरी परततील की नाही,अशा भितीच्या सावटाखाली असलेले पालक,हे सारे चित्र अत्यंत विदारक असून याची जबाबदारी घेऊन फडणवीस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे.पण तसे होणार नाही,कारण त्यांचे सरकार ” असंवेदनशील सरकार,” गटवारीत अव्वल क्रमांकावर आहे.बदलापूर बलात्कार,संतोष देशमुख,स्वारगेट बलात्कार प्रकरणी त्यांच्या सरकारच्या अब्रूची लक्तरे वेशीला टांगली गेली,पण सरकारच्या संवेदना जागृत झाल्या नाहीत.ज्या शहरात राज्याचा मुख्यमंत्री व एक वजनदार केंद्रीयमंत्री राहतो,त्या शहरात अशा प्रकारे हिंसाचार होतो,हे नक्कीच भूषणावह नाही.त्यामुळे निदान आता तरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या तीन महिन्यात झालेल्या अनेक घटनानंतर नैतिक जबाबदारी स्विकारत,अशोक चव्हाण,विलासराव देशमुख,शिवाजीराव निलंगेकर-पाटील,
आर.आर.पाटील,यांच्या पावलावर पाऊल ठेवत,नैतिक जबाबदारी घेत पायउतार झाले पाहिजे.

