दीपक मोहिते,
नागपूर हिंसाचार: सरकारने संयमाने वागण्याची गरज,विरोधकांनीही आगीत तेल ओतू नये,
ज्याची भिती होती,तेच नेमके नागपूर शहरात घडलं,या शहरात जी दंगल घडली,त्यामागे कोण आहेत.हे हुडकून त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.पण या सर्व प्रकरणी राज्याच्या तपास यंत्रणाचे पितळ उघड्यावर पडले आहे.शहरात काय चाललंय, याची खबरबात म्हणा सुगावा जर अन्वेषण विभागाला लागत नसेल तर या विभागाचीही सखोल चौकशी व्हायला हवी.
सध्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरुन चांगलाच वादंग सुरू असून राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून कबर हटवण्याची मागणी करत आंदोलन करण्यात येत आहे. मात्र,राज्याची दुसरी राजधानी असलेल्या नागपुरातील या आंदोलनानंतर तेथे हिंसाचार उफाळला व परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर गेली.नागपूरच्या चिटणीस पार्कजवळ आणि शिवाजी चौक परिसरात जाळपोळ व दगडफेकीची घटना घडल्या. या घटनेनंतर राजकीय वातावरण आता तापलं असून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे.अशावेळी मत्स्यव्यवसाय व बंदरविकासमंत्री नितेश राणे यांच्याकडून सातत्याने दोन धर्मात तेढ निर्माण होईल असे वक्तव्य केले जात आहे. दरम्यान,नागपूरच्या घटनेवर विधानसभेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी निवेदन सादर करत घटनेची सविस्तर माहिती दिली.नितेश राणे हे गेल्या काही दिवसापासून भडकाऊ भाषणे करत आहेत.त्यांच्यामागोमाग
सरकारमधील काही मंत्री आणि स्वतः मुख्यमंत्र्यांकडून जहाल वक्तव्ये करण्यात आली.मुख्यमंत्री फडणवीस यांनी राणे यांना रोखण्याऐवजी त्यांनीही अनेकदा तेल ओतायचे काम केले,त्यांचे दृश्यपरिणाम नागपूर शहरात पाहायला मिळाले. भडकाऊ वक्तव्ये सरकारकडून आणि सरकारच्या मंत्र्यांकडून केले जाणे अत्यंत चुकीचे आहे. आपण मंत्री आहोत,मुख्यमंत्री आहोत, राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, ही आपली जबाबदारी आहे, याचा त्यांना विसर पडावा यासारखे दुसरे दुर्देव नाही. कुराणवर जे लिहिलं जातं ते एका कपड्यावर लिहिलं होतं, तो कपडा जाळला.यासंदर्भात हिंदू व मुस्लिम लोकांनी पोलिसांकडून जाऊन हे थांबवा,अशी विनंती केली होती.मात्र,पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यानंतर रात्री हिंसाचार घडला.या घटनेच्या मागे कोणत्या शक्ती आहेत,याचा पर्दाफाश होणे गरजेचे आहे. पण आजवरचा अनुभव पाहता अशा घटनाच्या चौकशीचे अहवाल सरकार सार्वजनिक करत नसते.निदान आता तरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या सहकारी मंत्र्यांकडून होत असलेल्या भडकाऊ वक्तव्यांवर आवर घालायला हवे.
नागपूरमध्ये जी घटना घडली तो परिसर केंद्रीयमंत्री यांच्या घराजवळ असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील याच परिसरात राहणारे आहेत. त्यामुळे इंटीलिजन्स एजन्सीचे हे अपयश आहे.आता सत्ताधारी व विरोधक याविषयी एकमेकांवर तुटून पडत आहेत. पण सत्तेत असणाऱ्यांची जबाबदारी मोठी आहे.त्यांनी आपली आयडॉलॉजी बाजुला ठेवून या प्रकरणाकडे बघायला हवं. सर्वानी संविधानाचे अनुकरण करुन सरकार चालवले पाहिजे व विरोधी पक्षांनीही या अशा संवेदनशील विषयी आपली भूमिका निभावली पाहिजे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील आक्रमक हिंदुत्त्वाचे नवे आयकॉन आणि चेहरा होऊ पाहत असलेले भाजप नितेश राणे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समज दिल्याचे समजते.त्यामध्ये जर तथ्य असेल फडणवीस यांनी योग्य पाऊल उचलले, असे म्हणावे लागेल.आज नितेश राणे यांनी मुंबईत विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना पुढील काही दिवस शांत राहण्याचे बजावले आहे.बघूया राणे किती शांत राहतात ते ? म्हातारी मेल्याचे दुःख नाही,पण काळ सोकावता कामा नये,एवढीच फडणवीस व त्यांच्या सहकारी मंत्र्याकडून आपल्या अपेक्षा आहेत.

