दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
राज्य सरकार असुन नसल्यासारखे,आता हलाल मटण व औरंगजेबची कबर,राज्यासमोरचे ज्वलंत विषय,
राज्यात सध्या जे काही चाललंय ते पाहून सर्वसामान्य माणसाचे डोके पार चक्रावून गेले आहे.राज्यात अनेक प्रश्न व समस्या आ वासून उभे असताना आपले सरकार व आपण गेल्या निवडणुकीत आपली फसगत करून घेत निवडून दिलेले लोक आज हलाल मटण,अकबर व त्याची कबर,अशा फालतू विषयात अकला पाजळू लागले आहेत.गेल्या सहा दशकात फुले,शाहू,आंबेडकरांचा हा पुरोगामी महाराष्ट्र इतका रसातळाला गेल्याचा अनुभव कधीच आला नव्हता.
आपले अपयश झाकण्यासाठी सरकार अनावश्यक विषय उकरून काढत जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवत आहे.दुर्देवाने त्यांच्या या कुटील कारस्थानाला आपणही बळी पडत आहोत.
एकेकाळी प्रथम क्रमांकावर असलेले आपले राज्य,आज चौथ्या क्रमांकावर विसावले आहे.गेल्या तीन ते चार वर्षात राज्यातील अनेक उद्योग अन्य राज्यात गेले.पुण्यातील हिंजवडी येथे असलेल्या आयटी पार्कला आता अवकळा आली आहे.अनेक आयटी कंपन्या बाडबिस्तरा गुंडाळून इतर राज्यात स्थलांतरित झाले आहेत.अशी परीस्थिती निर्माण झाली असताना आपले मंत्री राज्यात नवीन उद्योगधंदे आणण्यासाठी दावोस या स्वित्झर्लंडमधील थंड ठिकाणी जात असतात,ही खऱ्या अर्थाने चिंतेची बाब आहे.त्यांच्या या दौऱ्यानंतर किती प्रकल्प महाराष्ट्रात आले,हा एक संशोधनाचा विषय आहे.या लोकांच्या दौऱ्याच्या खर्चाचे आकडे जर आपण पाहिले तर आपले डोळे पांढरे होतील,असे हे आपले राज्य आता आपण काय खावे काय खाऊ नये ? याविषयी प्रबोधन करू लागले आहे.
महागाई,ग्रामीण भागातील पाणीटंचाई व पायाभूत सोयी -सुविधा,प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांचे पुनर्वसन,शिक्षण,आरोग्य व रोजगारनिर्मिती,असे एक ना अनेक लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याऐवजी आपले सरकार हलाल मटण व औरंगजेबाची कबर,असे अनावश्यक विषय हाताळण्यात धन्यता मानत आहे.आज राज्याचे कृषी क्षेत्र हे सिंचन प्रकल्पाअभावी केवळ पावसाळी पाण्यावर अवलंबून आहे.सिंचन घोटाळ्यात कोणाचे उखळ पांढरे झाले,हे तुम्हा आम्हाला कोणी सांगायला नको. शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्याऐवजी धरणात मुतायला निघालेले महाभाग आज क्रमांक दोनच्या मंत्रिपदावर बसलेले पाहायला मिळते.ही आपल्या लोकशाही व्यवस्थेची एकप्रकारे क्रूर चेष्टाच म्हणावी लागेल.ज्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला आदर्श ठरेल असे संविधान दिले.आज त्या संविधानाची कबर खोदण्यासाठी आसूसलेले अतृप्त आत्मे थेट मंत्रिमंडळात शिरकाव करण्यात यशस्वी ठरले आहेत.उठसुठ छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जप करणाऱ्यांना महाराज व बाबासाहेब कधीच कळले नाही.
काल राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी स्वतःच्या सरकारच्या कानशिलात चांगलीच ठेवून दिली आहे.त्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर थेट आरोप केला,ते म्हणाले,मला विश्वासात न घेता माझ्या विभागाचा चार हजार कोटी रु.चा निधी,लाडकी बहीण योजनेकडे वळवला.त्यामुळे आम्हाला येणाऱ्या काळात विकासकामे करताना अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे.दलित व आदिवासी विद्यार्थ्यांना शिषवृत्ती देणे आम्हाला अशक्य होणार नाही.जर एक मंत्रीच अशी खंत व्यक्त करत असेल किंवा थेट अर्थमंत्र्यांवर आरोप करत असेल तर आपले सरकार कशा पद्धतीने काम करत आहे,हे स्पष्ट होते.

