दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
भाजपमध्ये निष्ठावंताची प्रचंड हेटाळणी,फडणवीस यांच्या लेखी पक्षनिष्ठा नगण्य,
विधानपरिषद पोटनिवडणूकीसाठी काल भाजपने आपले ३ उमेदवार जाहीर केले आहेत.यामध्ये जुन्या कार्यकर्त्यांना आणि प्रामुख्याने माधव भंडारी यांना डावलण्यात आले आहे.
भाजप स्वतःला इतरांपेक्षा स्वतःला वेगळा पक्ष म्हणवतो, पण सध्या हा पक्ष देखील काँग्रेसच्या वळणावर येऊन पोहोचला आहे.इतर पक्षाचे आमदार व खासदार फोडणे, त्यांना लाभाची पदे देणे,इ. गैरकामांना अक्षरशः ऊत आला आहे.तपास यंत्रणाचा ससेमिरा चुकवण्यासाठी भाजपमध्ये आलेल्या अनेकांना गेल्या बारा वर्षात भाजपने लाभाच्या पदाची खिरापती वाटल्या.संपूर्ण राजकीय जीवन काँग्रेसमध्ये घालवलेल्या विखेंना महसूल, जलसंधारण अशी महत्वाची खाती मिळाली.एका दिवसात भाजपमध्ये आलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना खासदारकी मिळाली. मात्र आता निष्ठावंतावर परत अन्याय झाला आहे. यालाच म्हणतात, ” पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा आणि वेश्येला सोन्याचा हार,”
राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणूक आली की, भाजपचे जुने निष्ठावंत तसेच अभ्यासू असलेल्या पदाधिकाऱ्यांना डावलेले जाते.भाजपच्या अडचणीच्या काळात प्रवक्तेपदाची धुरा समर्थपणे पेलणाऱ्या माधव भंडारी यांना कायम सावत्रपणाची वागणूक मिळाली.या दोन्ही निवडणुका जाहीर झाल्या की भंडारी यांचे नांव चर्चेत येते.मात्र त्यांना आजवर कधीही संधी मिळाली नाही.आताही जाहीर झालेले उमेदवार हे फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयांपैकी आहेत.सत्तेच्या राजकारणासाठी आपल्या समर्थकांची गर्दी वाढवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना पक्षनिष्ठा,प्रामाणिकपणा व सभ्यता याचे वावडे आहे.त्यामुळे माधव भंडारी सारख्या असंख्य निष्ठावंताना भाजपमध्ये उपेक्षित जीवन जगावे लागत आहे. माधव भंडारी हे राजकारणातील एक सभ्य गृहस्थ म्हणून ओळखले जातात.त्यामुळे फडणवीस यांना ते चालू शकत नाही. फडणवीस यांना गिरीश महाजन,नितेश राणे,निलेश राणे,प्रवीण दरेकर,राम कदम,प्रसाद लाड व मोहित कंबोज सारखी माणसे लागतात,त्यामुळे माधव भंडारी सारख्याना यापुढे संधी मिळेल असे वाटत नाही.

