दीपक मोहिते,
गेले ते दिवस,
रोजगार हमी योजनेचे जनक,
वि.स.पागे यांचा आज स्मृतिदिन,
काही वर्षांपूर्वी राज्यात दुष्काळ पडला असताना ऐतिहासिक निर्णय घेऊन ग्रामीण भागातील जनतेचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी रोजगार हमी योजना सुरु करणाऱ्या वि.स.पागे यांचा आज स्मृतिदिन आहे.२१ जुलै १९१० रोजी वाळवा तालुक्यातील बागणी येथे त्यांचा जन्म झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण तासगाव येथे झाले.त्यानंतर ते संस्कृत विषय घेऊन बी.ए.झाले,पण तेवढ्यावर न थांबता त्यांनी एल.एल.बी कायद्यांची पदवी घेतली.लहानपणापासूनच ते स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते.वाळवा हा तालुका क्रांतिकारकांचा तालुका म्हणून ओळखला जातो.१९३० ची कायदेभंगाची चळवळ तसेच १९४२ चे भारत छोडो आंदोलनामध्ये ते सक्रिय होते. त्यांनी तुरुंगवासही भोगला होता.स्वातंत्र्यानंतर वर्ष १९५२ ते १९६० या कालावधीत ते विधानपरिषदेचे सदस्य होते.त्यानंतर वर्ष १९६० ते १९७८ दरम्यान ते सलग १८ वर्षे एवढ्या प्रदीर्घ कालावधीसाठी विधान परिषदेचे अध्यक्ष होते.अत्यंत संयमी,शांत व मृदू स्वभावाचे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते.
रोजगार हमी योजनेच्या त्यांच्या कल्पनेबद्दल एक गोष्ट हमखास सांगितली जाते.महाराष्ट्रात साधारण १९७१ ते १९७४ या कालावधीमधे भीषण दुष्काळ पडला होता.त्यावेळी शेतकरी व कष्टकरी जनतेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली होती.
दुष्काळाच्या या परिस्थितीचा विचार करीत पागे हे एकदा आपल्या घरी झोपाळ्यावर बसले होते.त्यांनी त्यांच्या पत्नीला सहज विचारले,” प्रभा,घरात पैसे किती आहेत ?” प्रभाताईंनी सांगितले की,” सातशे रु.आहेत, ” त्यावर पागे यांनी पत्नीला विचारले,” सातशे रु.त आपल्या शेतावर किती गडी राबू शकतील ? ” घरातून सांगण्यात आले की,” किमान पंधरा गडी वीस दिवस सहज लावता येतील.”
मग काय पागे यांनी थेट मुख्यमंत्री वसंतराव नाईकांनाच पत्र लिहिले. त्यातील मजकूर असा होता,” मा.मुख्यमंत्री साहेब,माझ्या शेतावर सातशे रु.त चौदा-पंधरा दिवस वीस गडी मजुरीला लावता आले.आपण जर शंभर कोटी रु.बाजूला काढले,तर किती मजुरांना काम देता येईल ? आणि याच चार ओळीतून रोजगार हमी योजनेचा जन्म झाला.मुख्यमंत्री नाईक यांनी पागेना त्वरित बोलवून घेतले. नेमकं काय करायला हवं ते सगळं विचारलं.योजना फारच छान होती,पण शंभर कोटी रु. कुठून आणायचे ? या प्रश्नाने मुख्यमंत्री चिंतेत पडले.त्या काळात १०० कोटी रु.खूप मोठी रक्कम होती.त्यांनी या विषयावर विरोधी पक्षनेत्यांसह विशेष बैठक बोलावली.या बैठकीत त्यावेळचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते कृष्णराव धुळप उपस्थित होते.ते म्हणाले,” नाईकसाहेब, गरिबांना काम देत असाल तर या योजनेसाठी शंभर कोटी रु. उभे करण्यासाठी विधानसभेत आम्ही ” कर प्रस्ताव,” घेऊन येतो.” जगाच्या संसदीय लोकशाही इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाला मदत करण्यासाठी ” कर प्रस्ताव,” आणण्याची भूमिका सर्वप्रथम महाराष्ट्रात घेतली गेली.
पागे व नाईक दोघेही ग्रामीण भागातील असल्याने त्यांना शेतकरी व कष्टकरी जनतेचे प्रश्न व समस्यांची चांगली जाण होती.रोजगार निर्मिती व त्यातून विकास साधण्याची प्रक्रिया खऱ्या अर्थाने सुरु झाली.आता ही योजना मनरेगा नावाने ओळखली जाते.स्व.मुख्यमंत्री वसंतराव नाईक व वि.स.पागे यांच्या दुरदर्शीपणामुळे ग्रामीण भागातील कोट्यवधी लोकांच्या हाताला काम मिळू शकले.या योजनेला तत्कालीन पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांनी मंजुरी दिली व ती देशभरात लागू करण्यात आली.आजही योजने अंतर्गत रस्ते,पाझर तलाव,नाला बंडिंगची,विहिरी अशाप्रकारची कामे सुरु आहेत आणि मोदी सरकार व अंधभक्त विचारतात की गेल्या साठ वर्षात काँग्रेसने काय केले ?
राजकारण आणि समाजकारण,याची सांगड घालणारे पागे हे कवी,नाटककारही होते.त्यांचे ” पहाटेची नौबत,” आणि ” अमरपक्षी,” या नावाचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.त्यांनी ” वीर मोहन,” नावाचे नाटक लिहिले होते.तसेच ” निवडणुकीचा नारळ,” नावाची नाटिका लिहिली होती.” तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालत,” हे संगीत नाटक त्यांनी लिहिले.अशा थोर नेत्यांचे १६ मार्च १९९० रोजी त्यांचे निधन झाले.अशी माणसे हल्लीच्या दिवसात विरळच… आता धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे,दादा भुसे सारख्या कृषिमंत्र्यांना
आपल्याला झेलावे लागत आहे.गेल्या ७५ वर्षात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेले आहे,हेच हा इतिहास स्पष्ट करतो..

