दिपक मोहिते,
बॉटमलाईन,
शेवटचा स्तंभही आता कोसळण्याच्या तयारीत…
भारतातील प्रगल्भ लोकशाही व्यवस्थेचे चार आधारस्तंभ म्हणून कायदेमंडळ,कार्यकारी मंडळ,न्यायपालिका व प्रसिद्ध माध्यमे ओळखली जातात.जी आपल्या व्यवस्थेची तत्वे व प्रत्येक संस्थेची पाया मजबूत करत असतात.लोकशाहीची ताकद,प्रत्येक स्तंभाच्या ताकदीवर व ते एकमेकांना कसे पूरक आहेत,यावर अवलंबून असते.त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळाच्या ७८ वर्षापैकी सुमारे ६६ वर्षे हे चारही स्तंभ व्यवस्थित आपल्या पायावर उभे होते. सन २०१४ नंतरच्या १२ वर्षाच्या काळात चारही स्तंभ हळूहळू निखळू लागले आहेत.कायदेमंडळ,
कार्यकारी मंडळ व प्रसिद्धी माध्यमे ही तर केंव्हाच कोसळली आहेत,न्यायपालिका हा एकमेव स्तंभ टिकून होता. किमान या स्तंभाच्या माध्यमातून आपल्याला न्याय मिळू शकतो,असा भारतीय जनतेचा ठाम विश्वास होता,आता त्या विश्वासाला तडा जाऊ लागला आहे.सध्या हा स्तंभही डळमळीत होऊ लागला आहे.त्यामुळे आपली लोकशाही व्यवस्था धोक्यात येऊ लागली आहे.
कायदे करणाऱ्या कार्यकारी मंडळाने ( सरकार ) कायदे मंडळाला स्वतःची बटीक बनवल्यामुळे सर्वप्रथम या व्यवस्थेच्या गळ्याला नख लागले.या गैरप्रकाराला रोखणे,हे माध्यमाचे आद्य कर्तव्य होते,पण आपल्या गोदी मीडियाने कार्यकारी मंडळाच्या मांडीवर जाऊन बसण्यात धन्यता मानली.त्यामुळे कार्यकारी मंडळ बेफाम होत गेले.देशातील निवडणुका एक हाती जिंकून कार्यकारी मंडळाने कायदे मंडळ आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर आपल्याला फायदेशीर ठरतील,असे निर्णय घेत त्यांनी एकाधिकार व्यवस्थेचा मार्ग मोकळा केला.या प्रक्रियेत माध्यमानी प्रखर भूमिका पार पाडण्याची भूमिका निभावणे आवश्यक होते.पण तसं काही घडलं नाही.माध्यमे चालवताना लागणारा पैसा हा महत्वाचा घटक ठरला,कार्यकारी मंडळाने माध्यमाची ही कमजोरी ओळखली व त्यांनी जाहिराती व मागच्या दाराने या स्तंभावर पैश्याचे जाळे फेकले,त्या जाळ्यात माध्यमे पूर्णतः अडकली व माध्यमाचे ” गोदी मीडिया,” असे नामकरण झाले.
आता उरला शेवटचा स्तंभ तो म्हणजे न्यायपालिका.. चार पैकी तीन स्तंभ पार निखळून पडल्यानंतर लोकांना या स्तंभांचा आधार वाटत होता.पण २०१४ साली आलेल्या वावटळीत कसा बसा टिकून राहिलेल्या या स्तंभाचा पायाही ठिसूळ होऊ लागला.न्यायपालिकेचे अनेक निकाल संशयास्पद ठरले.दस्तुरखुद्द निवृत्त न्यायाधीश रंजन गोगोई हे कार्यक्रमात म्हणाले ” वेळेवर न्याय न मिळाल्यास,संस्थेवरील जनतेच्या विश्वासाला तडा जातो,आणि कायद्याचे राज्य राहत नाही.ज्यामुळे देशाच्या सर्वांगीण कल्याणावर परिणाम होतो.त्यांच्या या वाक्याचा आता पावलोपावली अनुभव येत आहे.गेल्या काही वर्षात अनेक निकाल संशयास्पद ठरले.आमदारांची अपात्रता,राजकीय पक्षाचे नाव व चिन्हाचे प्रकरण,राजकीय पक्षातील फूट,या सर्व प्रकरणी सरन्यायधीश चंद्रचूड हे वादाच्या भोवऱ्यात सापडले.आता आ.माणिकराव कोकाटे याना अपात्र ठरवण्यासंदर्भात नाशिक सत्र न्यायालयाने तकलादू कारण देत दिलेला व व्यवस्थेला छेद देणारा दिलेला निर्णय,हे सर्व पाहता चौथा स्तंभ देखील आता कोसळण्याच्या मार्गावर आहे.गेल्या बारा वर्षातील आपली वाटचाल आता एकाधिकार व्यवस्थेच्या दिशेने सुरू झाल्याचे स्पष्ट होत आहे.

