दीपक मोहिते,
बीड : तोडक कारवाई माणुसकीला काळिमा फासणारी,
गुंड खोक्याला जेरबंद केल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत निर्दयीपणे आपल्या वनजमिनीवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर व तसेच पारधी समाजाच्या झोपड्यावर कारवाई केली.खोक्याने उभारलेला काचेचा बंगला बुलडोझर लावून जमिनदोस्त करण्यात आला.वनविभागाच्या अधिकाऱ्यांची ही कारवाई किती न्यायाला धरून होती ? हा प्रश्न वादाचा मुद्दा असला तरी या कारवाईच्या आडून पारधी समाजाच्या झोपड्या पाडणे,हे नक्कीच अन्यायकारक आहे.
गुंड खोक्या प्रकरणी आपला विभाग अडचणीत येऊ नये,यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत घिसाडघाईने ही कारवाई केली आहे.खोक्याने वनजमिनीवर आलिशान काचेचा बंगला बांधत असताना या विभागाचे अधिकारी डोळ्यावर कातडे ओढून बसले होते का ? खोक्याने या अधिकाऱ्यांना मॅनेज करूनच हा बंगला बांधला असावा.त्यामुळे या प्रकरणाच्या चौकशीत आपले पितळ उघडे पडेल,अशा भितीतून हा बंगला धडक कारवाई करून जमिनदोस्त करण्यात आला.वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या या कारवाईचे कदापि समर्थन करता येणार नाही,कारण या प्रकरणी शासकीय नियम,न्यायव्यवस्था व माणुसकीला धाब्यावर बसवत ही कारवाई झाली आहे.खोक्या हा नामचीन गुंड आहे,त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे,याविषयी कोणाचेही दुमत नाही,पण त्याच्या कुटुंबियांना त्याची सजा देण्याचे कारण काय ? आज त्याचे संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले आहे.खोक्याचा बंगला हा काही एका दिवसात किंवा रात्रीच्या अंधारात उभारला गेला नाही.त्याला या वनधिकाऱ्यांची नक्कीच मदत झाली असली पाहिजे.त्यामुळे या बंगल्यावर अत्यंत वेगाने कारवाई करण्यात आली.येथे असलेल्या पारधी समाजाच्या झोपड्या रातोरात जाळण्यात आल्या.झोपड्या जाळणारे नराधम कोण आहेत ? याचा शोध लागला पाहिजे.पारधी समाजाच्या वस्तीवर तोंडाला रुमाल बांधून हल्ला करणारे हल्लेखोर कोण होते ? हे उघड व्हायलाच हवे.या सर्व घडामोडीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात लाखो हेक्टर जमिनीवर उभी राहिलेली कोट्यवधी अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्याचे आदेश आता देतील का ?

