दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
फडणवीस यांच्या घोषणा वेळ मारून नेण्यासाठी असतात…
” बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी कोणत्याही परिस्थितीत मोडून काढू,मग तो आका असो की खोक्या,प्रत्येकाला ठोकणारच,” अशी सिंहगर्जना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल प्रसिद्धी माध्यमांसमोर केली.पण त्यांच्या या गर्जनेला राज्याच्या रयतेने फारसे गांभीर्याने घेतले नाही.कारण फडणवीस यांना अधुनमधून अशा उचक्या लागत असतात व ते शब्दच्छल करत प्रचंड उत्साह व आवेशात बरंच काही बोलून जातात.त्यामुळे त्यांच्या या बोलण्याकडे लोकही फारसे लक्ष देत नाहीत.असो,आज आपण एका ज्वलंत विषयावर बोलणार आहोत.आपले देवाभाऊ गेल्या बारा वर्षात बरंच काही बोलले,” यंव करू,तंव करू,” पण सत्तेच्या हव्यासापोटी प्रत्यक्षात त्यांनी कधीच काही केले नाही,अशाच एका ज्वलंत विषयावर आज आपण प्रकाशझोत टाकणार आहोत.
२००० ते २०१० दरम्यान झालेल्या सिंचन घोटाळ्यामध्ये ” अजित पवार व सुनील तटकरे हे राज्याचे लालूप्रसाद यादव आहेत.या दोन लालूना,जेलमध्ये घालू,” अशी सिंहगर्जना फडणवीस व तावडे यांनी बारा वर्षांपूर्वी केली होती.त्यानंतर या दोघांनी सिंचन घोटाळ्याचा पुरावा म्हणून भाजपतर्फे १४ हजार कागदपत्रे पुरावे म्हणून चितळे समितीकडे मोर्चा नेऊन सादर केली.या कागदपत्रांच्या बॅगा बैलगाडीतून चितळे समितीच्या कार्यालयापर्यंत नेण्यात आल्या होत्या.या घटनेस आता एक तप ( १२ वर्षे ) पूर्ण झाले.ही बैलगाडी काही काळ तावडे व फडणवीस या दोघांनीही हाकली होती.आज तेच दोन लालू,अजित पवार व सुनील तटकरे हे गुलाबी पोशाख घालून फडणवीस यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आपण पाहत आहोत.
ही सर्व कागदपत्रे चितळे समितीसमोर सादर केल्यानंतर भाजपच्या या नेत्यांनी आपल्या भाषणात ” महाराष्ट्राचे दोन लालू,त्यांना जेलमध्ये घालू,” अशा राणा भीमदेवी थाटात वल्गना केल्या होत्या.यावेळी गोदावरी बॅरेजेस,कोंढाणे प्रकल्प,बेंबळा प्रकल्प,कुकडे प्रकल्पामध्ये देखील आर्थिक घोटाळा झाल्याचे आरोप करण्यात आले होते.यावेळी चितळे समितीचे प्रमुख माधवराव चितळे यांनी फडणवीस,तावडे,दानवे यांच्यासह भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी सुमारे तासभर चर्चा केली होती.या ऐतिहासिक घटनेला आता बारा वर्षे पूर्ण होत आली आहेत.ही सारी कागदपत्रे आता कुठल्या तरी गोदामात धूळ खात पडली आहेत.त्यामुळे फडणवीस जे काही बोलतात,ते वेळ मारून नेण्यासाठी असते,हे आपण लक्षात घ्यायला हवे.वास्तविक मिडियाने या ज्वलंत विषयाची वेळोवेळी त्यांना आठवण करून द्यायला हवी,पण आपली ” गोदी मिडीया,” ती करून देत नाही,यामागचे कारण तुम्हाला सांगायला नको.

