दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
बीड जिल्हा काही काळासाठी लष्कराकडे सोपवा आणि गुंडाचा नायनाट करा….
बीड जिल्ह्यात सध्या जे काही चालले आहे,ते पाहून सर्वसामान्य माणसाचे डोके सुन्न झाले आहे.गेल्या वर्षभरात सुमारे दोनशे जणांची हत्या,मोठ्याप्रमाणात खंडणी वसुली,पोलीस व प्रशासकीय यंत्रणा असून नसल्यासारखी, खालावलेली कायदा व सुव्यवस्थेची स्थिती,त्यामध्ये सुधारणा करण्याची जबाबदारी ज्या गृहखात्यावर आहे,त्याना आलेले अपयश व गृहमंत्री म्हणून फडणवीस यांची अकार्यक्षमता,आदी कारणामुळे बीडवासीयांचे जीणे कठीण होऊन बसले आहे.यावर उपाययोजना करण्याबाबत राज्य सरकारचे गृहखाते अयशस्वी ठरल्यामुळे केंद्रसरकारच्या गृहविभागाने लष्कराला पाचारण करणे,गरजेचे आहे.
या जिल्ह्यात पोलीस,महसूल,समाजकंटक व राजकारणी यांची हातमिळवणी झाल्यामुळे गुंडाची हिंमत वाढली आहे.या जिल्ह्यातील प्रत्येक गल्लीबोळात समाजकंटकांची मांदियाळी निर्माण झाली आहे.ही जी पिल्लावळ निर्माण झाली आहे,त्यामध्ये सतत वाढ होत आहे.सर्वसामान्य माणसाचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास पार उडाला आहे.या जिल्ह्यातील गुन्हेगारी समूळ उखडून टाकण्यासाठी केंद्र सरकारने हा जिल्हा मर्यादित कालावधीसाठी लष्कराकडे सोपवणे आवश्यक आहे.जिल्ह्यातील भयावह वातावरण पाहता, त्याशिवाय आता गत्यंतर नाही.परिस्थिती स्थानिक पोलिसांच्या हाताबाहेर गेली आहे.या गुंडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणे,स्थानिक पोलिसांच्या आवाक्याबाहेरचे झाले आहे.त्यामुळे ही जबाबदारी लष्कराकडेच सोपवण्याची नितांत गरज आहे.
आपल्या देशाच्या कायद्यात तशी तरतूद नसली तरी केंद्र सरकारच्या गृहविभागाने विशेष बाब म्हणून असा निर्णय घेणे आवश्यक आहे.एखादा टापू अशांत झाला किंवा सर्वसामान्य माणसाला जेंव्हा जगणं कठीण होते,त्याच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यात स्थानिक प्रशासन अपयशी ठरले तर विशेष बाब म्हणून केंद्र सरकार अशाप्रकारचा निर्णय घेऊ शकते.जम्मू-काश्मीर राज्यातील दहशतवाद/ हिंसाचार,मणिपूर/ आसाम राज्यातील वांशिक दंगली व हिंसाचार लक्षात घेऊन केंद्र सरकारने या राज्यात लष्कराला पाचारण केले.त्या धर्तीवर सरकारने ठराविक काळासाठी हा जिल्हा लष्कराकडे सोपवण्याची गरज आहे.अशाप्रकारची उपाययोजना झाली तर वाल्मिक कराड,खोके,बोके,खिंडकर या सर्वांचा आका असलेल्या गुंडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त होऊ शकेल व बीडवासीय मोकळा श्वास घेऊ शकतील.

