दीपक मोहिते,
क्रूर सरकारचा निर्दयीपणा,
आदर्श युवा शेतकरी पुरस्कार मिळालेल्या शेतकऱ्याची आत्महत्या….
बुलढाणा जिल्ह्यातील शिवणी अरमाळ गावचा रहिवासी असलेल्या कैलास नांगरे या तरुण शेतकऱ्याला राज्य सरकारचा आदर्श युवा शेतकरी पुरस्कार देण्यात आला होता.त्या युवा शेतकऱ्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली आहे.
गेल्यावर्षी १५ डिसे.२०२४ रोजी कैलास नागरे यांनी देऊळगाव राजा तालुक्यातील १४ गावांना खडकपूर्ण जलाशयातून शेतीसाठी पाणी मिळावं,या मागणीसाठी अन्नत्याग आंदोलन केलं होत. मात्र त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नेहमी प्रमाणे त्यांना आश्वासन देऊन आंदोलन मागे घ्यायला लावले.
शासनाने दिलेल्या आश्वासनानुसार,गेले तीन महिने कैलास नागरे यांनी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना खडकपूर्णा जलाशयातून पाणी मिळेल, अशा प्रतीक्षेत काढली.मात्र प्रशासन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत असल्याचे लक्षात आल्यानंतर काल होळी सणाच्या दिवशी कैलास नागरे यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली.ही आत्महत्या नसून सरकारने केलेला खून असल्याची आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी व्यक्त करत आहेत. तर याप्रकरणी शेतकऱ्यांना पाणी मिळालं नाही,तर आम्ही सामूहिक आत्महत्या करू,असा इशारा कैलास नागरे यांच्या पत्नीने दिला आहे.
राज्य शासनाने या शेतकऱ्याला नुकताच आदर्श शेतकरी पुरस्कार दिला होता पण सरकार त्याला न्याय देऊ शकले नाही.या मुर्दाड सरकारला शेतकऱ्यांप्रती कुठलेही देणेघेणे नसून हे सरकार राज्यात जातीय तेढ निर्माण करण्यात सक्रिय आहे, अशी टीका जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
ही घटना ऐन होळीच्या दिवशी घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.सरकार शेतकऱ्यांना पुरस्कार देते मात्र त्यांच्या शेतीला पाणी देऊ शकत नाही,असे म्हणायची पाळी आमच्यावर आली आहे,अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

