दीपक मोहिते,
” हल्लाबोल, ”
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लांबणीवर : भाजपच्या पथ्यावर,
तीन महिन्यापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने पालघर लोकसभा मतदारसंघातील सहापैकी तीन जागा जिंकत जिल्ह्याच्या राजकारणावर आपली मजबूत पकड बसवली आहे. या अभूतपूर्व विजयाने भाजपच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास प्रचंड दुणावला आहे.वसई व नालासोपारा विधानसभा आपण जिंकू, असा विचार स्वप्नात देखील त्यांनी केला नव्हता.पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात त्यांना जे यश मिळाले,ते त्यांना अपेक्षितच होते.पण वसई व नालासोपारा हे दोन विधानसभा अनपेक्षितरित्या हाती आल्यानंतर त्यांच्या पक्षाचा ग्राफ आता सतत वर जात आहे.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सतत लांबणीवर पडत आहेत,सदर बाब त्यांच्या पक्षाला फायदेशीर ठरणारी आहे.या निवडणुकीचे नियोजन करण्यासाठी त्यांना भरपूर अवधी मिळत आहे.त्याचा सध्या ते पुरेपूर उपयोग करत आहेत.विधानसभा निवडणुकांच्या वेळी त्यांनी याच पद्धतीने रणनिती आखली होती व ती १०० % यशस्वी ठरली.इतर पक्ष मात्र त्यावेळी हवेत होते.काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष भाजपच्या लेखी असून नसल्यासारखे आहेत.उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची अवस्था,सध्या पाने गळून पडलेल्या सुकलेल्या झाडासारखी झाली आहे. आजच्या घडीला त्यांच्याकडे सक्षम नेते व पदाधिकाऱ्यांचा भीषण दुष्काळ आहे.लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या कटू अनुभवानंतर बहुजन विकास आघाडीचे वरिष्ठ नेते पक्षबांधणी व नवीन चेहऱ्याना संधी,अशा दोन स्तरावर सक्रिय होतील,असे वाटले होते.पण तसं काही घडताना दिसत नाही.या पराभवाच्या धक्यानंतर तरी बहुजन विकास आघाडीचे नेते सावरतील,असे वाटले होते. तसही काही घडलं नाही.
पालघर जिल्ह्यातील राजकीय चित्र गेल्या पाच वर्षात कसे झपाट्याने बदलत गेले हे पाहण्यासाठी आपल्याला भूतकाळात जावे लागेल.
एकेकाळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व समाजवादी पक्षाचे या परिसरात बऱ्यापैकी वर्चस्व होते.आज हे दोन्ही पक्ष औषधालाही उरले नाहीत.९० च्या दशकात या दोन्ही पक्षाच्या पीछेहाटीला सुरुवात झाली,ती आजतागायत सुरूच आहे.त्यानंतरच्या काळात बहुजन विकास आघाडी,शिवसेना व मार्क्स. कम्यु.पक्षांचे संमिश्र वर्चस्व राहिले.या सर्व घडामोडीत भाजप कुठेच नव्हता.मात्र त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते राम नाईक व त्यांच्यानंतर स्व. चिंतामण वनगा यांनी लोकसभा जागेवर कायम आपली हुकूमत गाजवली. मात्र त्याकाळात भाजपने एकही विधानसभेची जागा लढवली नाही.अशी ही राजकीय स्थिती थेट २०२४ पर्यंत होती.त्यानंतरच्या एक वर्षाच्या काळात भाजपने या जिल्ह्यावर लक्ष केंद्रित केले. तत्कालीन पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर येथील निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी पक्षबांधणीवर लक्ष केंद्रित करत नियोजनबद्ध आखणी केली,त्याचे दृश्यपरिणाम लोकसभा व विधानसभा निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळाले.भाजपने लोकसभेची जागा प्रचंड मताधिक्याने जिंकली.या विजयाने जिल्ह्यातील भाजपला चांगलीच संजीवनी मिळाली व त्याचा अश्वमेघ घोडा विधानसभा निवडणुकीत चौफेर उधळला.
या निवडणुकीत जिल्ह्यातील एकूण सहा जागापैकी वसई,नालासोपारा व विक्रमगड या तीन जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आले.तर पालघर व बोईसर या दोन जागांवर एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार निवडून आले. राजेंद्र गावित व विलास तरे हे दोघेही मूळचे भाजपचे पण शिंदे गटाकडे प्रभावी उमेदवार नसल्यामुळे या दोघांना शिंदे गटातून उभे करण्यात आले. भाजपची ही खेळी चांगलीच फायदेशीर ठरली.डहाणू विधानसभा राखण्यात मार्क्स. कम्यु.पक्ष यशस्वी झाला असला तरी त्यांचे मताधिक्य बरेच खाली आहे.२०२९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना ही जागा टिकवणे कठीण होणार आहे.
विधानसभा निवडणुकापूर्वी या निवडणुकीत भाजप गनिमी काव्याचा पुरेपूर वापर करत बहुजन विकास आघाडीला खिंडीत पकडण्याच्या प्रयत्नात असल्याविषयी लेख लिहिले होते.पण पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्या निवडणुकीत भाजपची मातृसंघटना कशी सक्रिय होती,यावर प्रकाशझोत टाकला होता.भाजपचा अत्यंत वेगाने विस्तार होतोय,उत्तर भारतीय व गुजराती समाजात त्यांचा जनाधार वाढतोय,हे मी अनेकदा लिहिले,पण बविआचे सारे नेते हवेत राहीले व त्यांच्या राजकीय साम्राज्याला सुरुंग लागला. भाजपने या विधानसभा निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात,शिवसेना ( उबाठा ) बहुजन विकास आघाडी व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या तीन पक्षांना आस्मान दाखवले.या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीकडून अनेक अक्षम्य अशा चुका झाल्या,त्या केवळ अंगलटच आल्या नाहीतर,काही समाज त्यांच्या पक्षापासून दुरावले. तसेच ऐन निवडणुकीच्या धामधूमीत गृहकलह व हॉटेलमध्ये झालेल्या हाणामारीचे जे नाट्य घडले,ते नाट्यही भाजपच्या पथ्यावर पडले.एवढे महाभारत घडल्यानंतरही बहुजन विकास आघाडीचे वरिष्ठ नेते अद्याप चार्ज का होत नाहीत,हे एक न उलगडणारे कोडेच आहे.त्यामुळे आगामी वसई-विरार शहर महानगरपालिका निवडणूक जिंकणे भाजप वगळता अन्य पक्षांना सहजासहजी शक्य होणार नाही.पूर्वी पालकमंत्री असलेले रविंद्र चव्हाण हे आता प्रदेश कार्याध्यक्ष तर पालकमंत्री म्हणून गणेश नाईक या निवडणुकीत प्रचंड ताकदीने उतरण्याची शक्यता आहे.

