दीपक मोहिते,
अरे हाssड… मी गंगाजल पिणार नाही..
दोन दिवसापूर्वी राज ठाकरेंनी गंगाजलाची उडवलेली खिल्ली व केलेले हातवारे हे कोणाच्याच मनाला पटलेले नाही.गंगाजल हे किती शुद्ध आहे,हा मुद्दा महत्वाचा नाही. पण पुराण काळापासून वाहणाऱ्या गंगा नदीशी तुमच्या आमच्या धार्मिक भावना निगडीत आहेत.या नदीकिनारी राहणारा स्थानिक नागरिक त्या पाण्यावरच आपली तहान भागवत असतो,हे आपण लक्षात घ्यायला हवे होते.लोकांच्या आस्था या गंगाजलाशी वर्षानुवर्षे जोडल्या गेल्या आहेत.ते तुम्हाला कदापि नाकारता येणार नाही.
तुमच्या पक्षाचे काही पदाधिकारी पक्षाचा महत्त्वाचा कार्यक्रम बुडवून कुंभमेळ्याला गेले होते.त्यांना तूम्ही जाब विचारायला हवा होता. त्यापैकी एका पदाधिकाऱ्यांने तुमच्यासाठी गंगाजल आणले आणि त्याला तूम्ही हाssड म्हणत ते गंगाजल पिणार नाही,अशी राणा भीमदेवी थाटात आरोळी ठोकता तसेच विक्षिप्त हातवारे करता,हे आपल्या पक्षात कसा वैचारिक गोंधळ आहे,हेच दाखवून देते.पक्षाचा अध्यक्ष म्हणून तुम्ही आपल्या पदाधिकाऱ्यांना समजून घेत नसाल तर हा पक्षाच्या दृष्टीने नक्कीच चिंतेचा विषय आहे.आपला पक्ष उभारण्यात ज्या लोकांनी खस्ता खाल्या,अंगावर केसेस घेतले व अपार कष्ट उपसले,त्यांना जर तुम्ही अशाप्रकारची वागणूक देत असाल तर ” देव तुमचे भले करो,” असंच म्हणावे लागेल.
आषाढी एकादशीच्या वारीसाठी शेकडो मैल पायपीट करून पंढरपूरला जाणारा वारकरी चंद्रभागेचे पाणी पिण्यायोग्य आहे किंवा नाही याचा विचार करून जात नाही.त्याला फक्त त्या अमृतस्नानाचा अनुभव घ्यायचा असतो.हे जरा समजून घ्या..
मला एकहाती सत्ता द्या, एकदा अख्खा महाराष्ट्र माझ्या ताब्यात द्या,माझी विकासाची ब्लू प्रिंट तयार आहे,हे जनतेला वारंवार सांगताना त्याच जनतेच्या धार्मिक भावना तूम्ही दुखावणार असाल तर तुमच्या पक्षाचे भवितव्य कायम अंधारात चाचपडत राहणार. मते मागायला गेलात तर मतदारही “अरे हाssड,” असाच सुर आळवतील. मतदारांची अशी जाहीर खिल्ली उडवली तर हाच मतदार मतपेटीतून तुम्हाला हाssड,असे म्हणत खिल्ली उडवतो.या मतदाराने अटलबिहारी वाजपेयी व इंदिरा गांधी यांच्या पाठीला माती लावली.तुमच्या चिरंजीवाला तोच अनुभव नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत घ्यावा लागला.तुमच्या पक्षाकडे कोणताही ठोस कार्यक्रम नाही, दुसऱ्या फळीतील नेते नाहीत, आपल्या पक्षांची इतकी दारुण अवस्था झाली असताना आपण कसे वागतो,याचे जर भान राहत नसेल तर काही खरं नाही..
धर्म ही अफूची गोळी आहे ही मार्क्सवाद्यांची विचारधारा बासनात गुंडाळून त्याच पक्षाच्या सर्वोच्च नेते सीताराम येचुरी यांनी हैदराबाद येथे महाकाली उत्सवात डोक्यावर पुष्पकलश घेऊन शोभायात्रेत हजेरी लावली होती.कारण बदलत्या काळानुसार त्यांनाही मतदाराची धार्मिक भावना लक्षात घ्यावी लागली.पण गेल्या ७० वर्षात पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले होते. त्यांच्या या वाटचालीत पक्षाचा बाजारच नाहीसा झाला होता.

