दीपक मोहिते,
राज्याच्या शहरी भागात दरडोई उत्पन्न वाढले,
नुकत्याच पार पडलेल्या आर्थिक पाहणीत आपल्या राज्याचे दरडोई उत्पन्नात चांगली वाढ झाली आहे.
सरासरी दरडोई उत्पन्न २ लाख ७८ हजार ६८१ रु.इतके झाले आहे.तर देशाचे सरासरी दरडोई उत्पन्न हे १ लाख ८८ हजार ८९२ रु.आहे.मात्र ज्या शहराचे दरडोई उत्पन्न वाढले आहे,तेथे दरडोई खर्चात देखील लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
राज्यात एकूण ३६ जिल्हे असले तरी आर्थिक पाहणी अहवालात मुंबई शहर आणि उपनगर हा एकच जिल्हा गृहीत धरण्यात आला आहे. तर ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांचे एकत्र दरडोई उत्पन्न दाखवण्यात आले आहे.अहवालातील आकडेवारीनुसार राज्यातील १२ जिल्हे हे देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या खालच्या स्तरावर आहेत.यामध्ये मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांपैकी पाच जिल्ह्यांचा समावेश आहे.३४ जिल्ह्यांमध्ये नांदेड-२५ क्रमांकावर, जालना-२६,बीड २७,परभणी २८ आणि हिंगोली ३० व्या क्रमांकावर आहे.तर देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या खाली असलेल्या जिल्ह्यांमध्ये विदर्भातील गोंदिया,यवतमाळ, गडचिरोली आणि वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे.
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि नंदुरबार,या जिल्ह्यांचेही सरासरी दरडोई उत्पन्न देशाच्या सरासरीच्या खाली आहे.तर देशाच्या सरासरी दरडोई उत्पन्नाच्या खाली असलेल्या जिल्ह्यात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील एकाही जिल्ह्याचा समावेश नाही.
मुंबई ” नंबर वन,” वर,तर नंदुरबार सर्वांत शेवटच्या क्रमांकावर आहे.
सर्वांत जास्त दरडोई उत्पन्न ४ लाख ५५ हजार ७६७ हे मुंबईचे आहे,तर त्याखालोखाल ठाणे ( पालघर समाविष्ट ) ३ लाख ९० हजार ७२६,तिसऱ्या क्रमांकावर पुणे ३ लाख ७४ हजार २५७ रु.तर चौथ्या क्रमांकावर नागपूर जिल्हा ३ लाख २२ हजार ९२७ रु.आहे.सर्वांत शेवटी उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याचा क्रमांक असून,तेथील दरडोई उत्पन्न जेमतेम दीड लाखाच्या घरात आहे.तर दरडोई उत्पन्नाच्या क्रमवारीत गडचिरोली,हा आदिवासी जिल्हा बुलढाणा आणि वाशिमच्या वर आहे.
महसुली उत्पन्न ५.०९ टक्क्यांनी वाढले.
राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार २०२४-२५ मध्ये राज्याचा स्वतःचा कर महसूल ३ लाख ४३ हजार ४० कोटी रु.असण्याची अपेक्षा असून,तो गतवर्षीच्या तुलनेत ५.०९ टक्क्यांनी वाढला आहे. २०२३-२४ वर्षात महसूल ३ लाख २६ हजार ३९८ कोटी रु.होता.
महसुलात जीएसटीचा वाटा १ लाख ४४ हजार ७९१ कोटी रु.च्या तुलनेत १ लाख ५५ हजार ७५६ कोटी रु. इतका सर्वाधिक असेल.२०१७ पासून भारतातील एकूण जीएसटी संकलनात महाराष्ट्र इतर राज्याच्या तुलनेत अव्वल क्रमांकावर आहे.
मात्र ज्या शहरात दरडोई उत्पन्न चांगले आहे,तेथे दरडोई खर्च देखील वाढला आहे. जीवनावश्यक वस्तूची भाववाढ,जीएसटी दरात वारंवार होणारे बदल व अन्य कारणामुळे खर्चातही भरमसाठ झाल्याचे दिसून आले आहे.

