दीपक मोहिते,
जागतिक महिला दिन ; ग्रामीण भागातील कष्टकरी महिला आजही उपेक्षित,
आज जागतिक महिला दिन,जगभरात तो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.महिलांनी आपल्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस,आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतो.महिलांचा खरा सन्मान राज्याचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी काही वर्षांपूर्वी महिलांना आरक्षण देऊन केला होता.त्याचे सकारात्मक परिणाम आपल्याला पाहायला मिळाले.आज कोट्यावधी महिला विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होऊ शकल्या.मात्र ग्रामीण भागातील कष्टकरी महिला आजही कबाडकष्ट करत हलाखीचे जीवन जगत आहेत. हे चित्र जेंव्हा बदलेल,तेव्हांच खऱ्या अर्थाने महिलांना न्याय मिळाला,असे आपल्याला म्हणता येईल.
हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यामागे नेमका उद्देश काय होता व तो कितपत साध्य होऊ शकला याविषयी आपण जाणून घेऊया.
सन १९१० मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावानुसार ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून जाहीर करण्यात आला.पूर्वी पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये महिलांना फारसे महत्व दिले जात नसे,त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असे.८ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून जाहीर करण्यात आला असला तरी २८ फेब्रु.१९०९ रोजी पहिला महिला दिन साजरा करण्यात आला.
१९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या परिषदेमध्ये क्लारा झेटकीन,या साम्यवादी ( कम्युनिस्ट ) कार्यकर्तीने सार्वत्रिक मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी आंदोलन करणे,हे प्रत्येक समाजवादी महिलेचे कर्तव्य आहे,अशी घोषणा केली.त्यानंतर ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्क येथे वस्त्रोद्योग क्षेत्रातील हजारो महिला कामगारांनी रुटगर्स चौकात एकत्र येऊन ऐतिहासिक निदर्शने केली.यावेळी महिलांनी १० तासाचा दिवस,कामाच्या ठिकाणी सुरक्षितता व अन्य मागण्या केल्या.त्यानंतर क्लारा झेटकीन यांनी ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्विकारावा,असा ठराव मांडला व तो एकमताने मंजूर झाला.युरोप,अमेरिका व अन्य देशात मतदानाच्या हक्कासाठी विविध महिला संघटनांनी मोहिमा उघडल्या.अमेरिका व इंग्लंडमध्ये या मागण्या मान्य झाल्या.
आपल्या देशात पहिला ८ मार्च हा महिला दिन १९४३ साली साजरा करण्यात आला.पुढे संयुक्त राष्ट्र समितीने ( युनो ) १९७५ हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केले.
त्यानंतर महिलांच्या समस्या जगासमोर येऊ लागल्या.त्यामध्ये सामाजिक,आर्थिक,राजकीय व सांस्कृतिक समस्यांचा समावेश होता.आरक्षण,नोकरी व सत्तेच्या राजकारणात महिलांचा सहभाग,इ.कामे हळूहळू मार्गी लागली.त्याचे दृश्य परिणाम शहरी भागात पहावयास मिळाले,परंतु ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांचे खडतर जीवन पाहिल्यास लढाई शतकानुशतके चालतच राहणार आहे.त्यामुळे जगभरातील देशांनी यासंदर्भात पावले उचलण्याची गरज आहे,तरच समस्त महिला वर्गाला न्याय मिळू शकेल.

