दीपक मोहिते,
आज मराठी राजभाषा दिन,पण शासनस्तरावर मात्र उदासीनता,
आज मराठी भाषा दिन असून तो दरवर्षी शासनस्तरावर मोठ्या उत्साहात साजरा होत असतो.मराठी भाषेला केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिल्याच्या पार्श्वभूमीवर यंदा हा दिन उत्सव म्हणून साजरा व्हायला हवा होता. पण दुर्देवाने तसं घडताना दिसत नाही.एकीकडे आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचा आनंद जरूर आहे.पण दुसरीकडे मराठी भाषेची होत असलेली गळचेपी ही दुर्देवी तर आहेच पण मराठी मन व मराठी अस्मितेला क्लेशकारक ठरणारी आहे. मराठी माणसांवर हिंदी बोलण्याची जी सक्ती वारंवार होत असते, वेळप्रसंगी मारहाण होते.हे न्यायाला धरून नाही.पण आपले सरकार या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने बघायला तयार नाही.असो,” कोळसा कितीही उगाळला तरी काळाच, ” अशी स्वतःची समजूत घालून घेऊया.
मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन हा दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो.१ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मराठी भाषिकांचे राज्य अस्तित्वात आले.त्यामुळे दरवर्षी १ मे हा दिवस ” १९६५ पासून मराठी राजभाषा दिन,” म्हणून अधिकृतपणे साजरा केला जातो.
अनेक वेळा सर्वसामान्य माणसाकडून ” मराठी राजभाषा दिवस,” आणि ” मराठी भाषा गौरव दिन,” याची गफलत केली जाते.मराठी राजभाषा दिन आणि भाषागौरव दिन हे दोन्ही दिवस भिन्न स्वरुपाचे आहे.” महाराष्ट्र राजभाषा अधिनियम १९६४,” नुसार,महाराष्ट्राची अधिकृत राजभाषा मराठी असेल,”असे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी घोषित केले होते.महाराष्ट्र स्थापनेवेळी राज्यकारभार इंग्रजी भाषेतून चालत असे.राज्य स्थापने वेळी मराठीला राजभाषेचा दर्जा नव्हता.तत्कालीन वसंंतराव नाईक सरकारने मराठी राजभाषा अधिनियम पारित करून पुढे मराठी भाषा संवर्धनासाठी विविध उपक्रम हाती घेतले.राज्यात ठिकठिकाणी मराठी भाषा शिकवण्यासाठी प्रशिक्षण वर्ग उघडण्यात आली.मराठी भाषेचा सर्वांगाने परिचय करून देण्यासाठी ” राज्यभाषा परिचय,” हे पुस्तक तयार करण्यात आले.मराठी भाषेचा राज्यातील शासन व्यवहारात वापर करण्याचे धोरण राबवण्यासाठी महाराष्ट्र शासन निर्णयानुसार भाषा संचालनालय स्थापन झाले.१ मे मराठी भाषा दिनाला जागतिक मराठी भाषा दिन असेही म्हणतात.
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते मराठी कवी कुसुमाग्रज यांचे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान मोठे असल्याने त्यांना अभिवादन म्हणून २१ जाने.२०१३ रोजी महाराष्ट्र शासनाने त्यांचा जन्मदिवस ” २७ फेब्रुवारी,” हा ” मराठी भाषा गौरव दिन,” म्हणून घोषित केला.मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हे दोन्ही दिवस वेगवेगळे असून मराठी भाषे संदर्भात हे दोन्ही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत.

