दीपक मोहिते,
” कुछ तो गडबड है,” ” दालमे कुछ काला भी है,”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,या दोघांमध्ये निर्माण झालेली दरी दिवसेंदिवस अधिक रुंदावत चालली आहे.तर दुसरीकडे सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,हे फडणवीस यांच्यावर सध्या टीकेची झोड उठवत नाहीत.उलट ठाकरे हे फडणवीस यांचे सतत कौतुक,अभिनंदन करत भेटीगाठी घेत आहेत.त्यामुळे ” कुछ तो गडबड है,” अशी चर्चा सुरू झाली आहे.या सर्व घडामोडीमुळे शिंदे गटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही दिवसांपासून अनेक धक्कादायक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.मंत्र्यांचे स्वीय सचिव व ओएसडी नेमण्याचे अधिकार स्वतःकडे घेत अनेक मंत्र्यांच्या वसुलीबाज लोकांना बाहेरचा दरवाजा दाखवला. त्यामुळे शिंदे गटाच्या अनेक मंत्र्यांनी खाजगीत संताप व्यक्त केला आहे.या प्रकरणी फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) गटाचे वादग्रस्त कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे चांगलेच कान उपटले.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिवसेंदिवस आक्रमक होत असून त्यांनी सत्तेत आल्या आल्या
मंत्रिमंडळाच्या बैठकीतील गोपनीय माहिती माध्यमांना देणाऱ्या मंत्र्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या.गोपनीय माहिती उघड करण्याचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत,अशा स्पष्ट शब्दात त्यांनी मंत्र्यांना खडे बोल सुनावले.त्यानंतर मंत्र्यांचे स्वीय सचिव व ओएसडी नेमण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांचे असल्याचे जाहीर करून टाकले.हा निर्णय जाहीर करताना ते म्हणाले,” मी कोणत्याही परिस्थितीत या दोन्ही पदी दलालांची नियुक्ती होऊ देणार नाही,” त्यांच्या या वक्तव्याने मंत्र्यांचे धाबे दणाणले आहे.गेल्या महिन्याभरात शिंदे यानी पुनर्जीवित केलेल्या त्यांच्या अनेक प्रकल्पाना रेड सिग्नल दाखवत स्थगिती देऊन टाकली.परिवहनमंत्री प्रताप
सरनाईक यांचे एसटी महामंडळाच्या कोट्यवधी रु.किमतीच्या जमिन विक्रीस काढण्याचे स्वप्न फडणवीस यांनी धुळीला मिळवले.सरनाईक मंत्रीपदी आल्या आल्या,नको ते स्वप्न पाहू लागल्यामुळे फडणवीस यांनी महामंडळाच्या अध्यक्षपदी आपल्या मर्जीतील सनदी अधिकाऱ्याला बसवून त्यांचे पंखच छाटून टाकले.हे सारे घडत असताना सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अचानकपणे ” फडणवीस चालीसा,” सुरू केले.या चालीसाच्या माध्यमातून त्यांनी फडणवीसांवर स्तुतीसुमने उधळण्यास सुरुवात केली.फडणवीस व ठाकरे या दोघांची झालेली भेट,खूप काही घडणार असल्याचे संकेत मिळत आहेत.” कुछ तो गडबड है,साथमे दालमे कुछ काला भी है,” अशी चर्चा मंत्रालयात सुरू झाली आहे.शिंदे यांचे पंख छाटतयानंतर अजित पवार यांच्यावर फडणवीस यांची वक्रदृष्टी पडण्याची शक्यता आहे.

