दीपक मोहिते,
वसई विरार मनपा आगामी निवडणूक ; उत्तर भारतीय व गुजराती समाजाचे मतदान ठरणार निर्णायक,
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा तिढा अद्याप सुटला नसतानाही महायुतीचे प्रमुख घटक असलेले भाजप,शिवसेना ( एकनाथ शिंदे ) व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार ) हे पक्ष आता कामाला लागले आहेत.या तिन्ही पक्षात सध्या जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे.दिवसागणिक अन्य पक्षाचे माजी आमदार व पदाधिकारी त्यांच्या पक्षात दाखल होत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पालघर जिल्ह्यातही या प्रक्रियेला सध्या वेग आला आहे.दोन दिवसांपूर्वी सुमारे चारशे ते पाचशे तरुणांनी नालासोपारा येथे एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला.आजपर्यंत वसईकरानी भाजपच्या प्रवेश सोहोळ्याचे अनेक इन्व्हेंट पाहिले,पण शिंदे गटात तरुणांचे इतक्या मोठ्या संख्येने प्रवेश,हा त्यांच्यासाठी पहिलाच अनुभव होता.त्यासाठी जिल्हाध्यक्ष निलेश तेंडोलकर यांच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी करण्यात आली होती.
दुसरीकडे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपही कसून कामाला लागला आहे.अत्यंत गोपनीय पद्धतीने आपले काम सुरू केले आहे.महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या ऐन तोंडावर मोठा गौप्यस्फोट करण्याच्या तयारीत आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील अभूतपूर्व यशाने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रचंड उत्साहात असून त्यांनी आतापासून जमिनीस्तरावरील कामामध्ये स्वतःला झोकून दिले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा गुजराती,मारवाडी व राजस्थानी समाजात असलेला प्रभाव तर उत्तर भारतीय समाजात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची असलेली क्रेझ,अशा दोन कारणामुळे या समाजातील तरुण-तरुणींचा कल हा भाजपकडे असल्याचे स्पष्ट होत आहे.गेल्या काही वर्षात वसई,विरार व नालासोपारा,या तीन महानगराच्या पूर्व भागात उत्तर भारतीयांच्या लोकसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे,तर पश्चिमेस गुजराती,मारवाडी व राजस्थानी या तीन समाजाच्या लोकसंख्येचा वेलू गगनावर गेला आहे.नालासोपारा विधानसभा निवडणुकीत वरील समाजाने भाजपच्या पारड्यात भरभरून मते टाकली,त्यामुळे भाजपच्या उमेदवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.वसई विधानसभा मतदारसंघात स्नेहा दुबे यांच्या विजयात त्यांचे वडील विवेक पंडित यांचा मोलाचा वाटा होता.त्यांनी आखलेली रणनिती भाजपला फायदेशीर ठरली.या निवडणुकीत त्यांनी ख्रिस्ती मते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार विजय पाटील यांच्याकडे वळवली.ख्रिस्ती समाज हा आजवर कधीही भाजपचा मतदार नव्हता,हे लक्षात घेऊन विवेक पंडित यांनी ही खेळी केली.या खेळीमुळे बहुजन विकास आघाडीला होणारे मतदानही पाटील यांना झाले.या खेळीनेबख्रिस्ती समाजाची एक गठ्ठा मते काँग्रेसच्या पारड्यात गेली व बहुजन विकास आघाडीचा घात झाला.

