दीपक मोहिते,
थ्री वॉर रूम वॉर : संघर्ष पराकोटीला,
महायुती सरकारमध्ये दररोज कोणत्या ना कोणत्या कारणावरून धुसफूस सुरू असते.आता मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर असलेल्या तीन प्रमुख नेत्यांच्या वॉर रूमवरून घमासान सुरू झाले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात राज्यात सुरू असलेल्या विकासकामांवर नजर ठेवणे व वेळोवेळी आढावा घेणे,यासाठी वॉर रूमची निर्मिती केली होती.त्यांच्या मागोमाग अजित पवार यांनीही आपली वॉर रूम सुरू केली होती,पण तीला अवघ्या काही दिवसात टाळे लागले होते.

त्यांची वॉर रूम का बंद झाली,हा एक वेगळा विषय आहे.पण आता ती पुन्हा सुरू झाली आहे.राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी अचानकपणे याच मजल्यावर आपली वॉर रूम सुरू केली आहे.त्यामुळे अजित पवार हे खडबडून जागे झाले व त्यांनी आपल्या वॉर रूमचे टाळे उघडले.हा सारा प्रकार म्हणजे ” एक संसार व तीन चुली,” असाच म्हणावे लागेल.या वॉर रूमच्या निमित्ताने राज्यात तीन समांतर सत्ताकेंद्रे निर्माण होत आहे का ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.विधानसभा निवडणुका झाल्यानंतर फडणवीस व शिंदे या दोघांमध्ये दरी निर्माण झाली असून ती दिवसेंदिवस अधिकाधिक रुंदावत चालली आहे.अनेक प्रश्नी या दोघांमध्ये बेबनाव निर्माण झाला असून गेल्या तीन महिन्यात फडणवीस यांनी बोलावलेल्या तीन बैठकांना शिंदे यांनी दांडी मारली.या सर्व बैठकीत शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास विभागाशी संबधित विषय होते,पण शिंदे यांनी या बैठकीस दांडी मारत फडणवीस यांना ठेंगा दाखवला.आता शिंदे यांनी सातव्या मजल्यावर फडणवीस यांच्या वॉर रूम शेजारी आपली वॉर रूम सुरू करून कुरघोडी केल्याची चर्चा मंत्रालयात रंगू लागली आहे.शिंदे या आपल्या वॉर रूम मधून एमएसआरडीसी,नवी मुंबई विमानतळ प्रकल्प,तिसरी मुंबई नैना प्रकल्प,सिडको निवासी प्रकल्प,शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प,कोकण कोस्टल रोड, विरार-अलिबाग सुपर एक्प्रेस कॉरिडॉर,मुंबई कोस्टल रोड वांद्रे सी-लिंक- विरार प्रकल्प,समृद्धी महामार्ग,इ.महत्वाकांक्षी विकासकामांवर नजर ठेवणार आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रूमच्या माध्यमातून समांतर सरकार चालवण्याचे प्रयत्न सुरू केल्याचे स्पष्ट होत
आहे.शिंदे यांनी आपले स्वतंत्र वॉर रूम सुरू केल्यानंतर अजित पवार यांनीही लगबगीने बंद पडलेल्या आपल्या वॉर रुमचे टाळे उघडले.शिंदे यांच्या या कृतीमुळे महायुतीमध्ये संघर्षाची वात पेटल्याचे मानण्यात येत आहे.

