दीपक मोहिते,
” कटू सत्य,”
एसटी महामंडळ ; मंत्र्यांची नजर भुखंडाचे श्रीखंड लाटण्यावर,
राज्यातील जनतेची लालपरी,अशी ओळख असलेल्या एसटी सेवेची गेल्या काही वर्षात पार दुर्दशा झाली आहे.अशावेळी नवनिर्वाचित परिवहनमंत्री
प्रताप सरनाईक हे महामंडळाचे भूखंड विकून श्रीखंड लाटू पाहत आहेत.दरवर्षी पाच हजार वाहने विकत घेण्याचा त्यांचा विचार आहे.सलग पाचवर्षे खरेदी झाल्यानंतर महामंडळाच्या ताफ्यात २५ हजार गाड्या असतील,अशा पद्धतीने नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.पण त्यांची ही चाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आली व त्यानी महामंडळाच्या अध्यक्षपदी उच्चपदस्थ सनदी अधिकाऱ्याला आणून बसवले.
मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमीनीची विक्री व गाड्या खरेदी,अशा दोन खरेदी-विक्री व्यवहारातून डबघाईला आलेल्या एसटी सेवेला उर्जितावस्था येणार का ? हा खरा प्रश्न आहे.परिवहन मंत्रालयातील उच्चपदस्थ व एसटी महमंडळाच्या झारीतील शुक्राचार्यांनी गेल्या काही वर्षात या सेवेची पार दुर्दशा करून ठेवली आहे.महामंडळाच्या सेवेतील वाहनांची झालेली दुरावस्था,साहित्याची अनुपलब्धता,साहित्य खरेदीतील बजबजपुरी व वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या कामगारांच्या मागण्या,इ.गैरप्रकारामुळे
ही सेवा सध्या दोलायमान अवस्थेत आली आहे.गळकी वाहने,अस्वच्छता,
बेशिस्तपणा व संचालक मंडळाचा मनमानी कारभार,आदी कारणामुळे प्रवासी आता हळूहळू खाजगी सेवेकडे वळू लागले आहेत.ग्रामीण भागात प्रवासी वाहतुक करणाऱ्या काळ्या-पिवळ्या वाहनाचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे.या सर्व गैरप्रकारावर उपाययोजना करण्याऐवजी बिल्डर असलेले आपले परिवहनमंत्री मोक्याच्या ठिकाणी असलेले भूखंड विकायला निघाले आहेत.भूखंड विक्रीतून कोणाकोणाचे नशीब फळफळणार आहे,हे तुम्हा – आम्हाला कोणी सांगण्याची गरज नाही.महामंडळाच्या पालघर विभागातील एसट्याच्या छताचे पत्रे तुटल्यामुळे सध्या टपावर ताडपत्री टाकण्यात आल्या आहेत.अनेक एसट्या धोकादायक स्थितीत असूनही त्या रस्त्यावरून धावताना पाहायला मिळतात.या अशा गैरप्रकारामुळे या सेवेच्या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत आहे,त्याचा परिणाम या विभागाच्या महसुलावरही जाणवू लागला आहे.अशावेळी परिवहनमंत्री भूखंडाचे श्रीखंड फस्त करू पाहत आहेत.परिवहन मंत्र्यांची ही चाल,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्वरित हालचाल करून त्यांच्या मुसक्या बांधल्या.त्यामुळे भूखंड विक्री व वाहने खरेदी,या व्यवहाराला तात्पुरता विराम मिळाला आहे.

