दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
मंत्र्यांनी बेताल वक्तव्य करण्यापूर्वी संविधानातील शपथेची आठवण ठेवावी,
राज्याचे मत्स्यउद्योग/ बंदरे विकास मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी कुडाळ येथे झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना मविआच्या सरपंचाला एक रु.चा निधी मिळणार नाही,विकासासाठी निधी हवा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा,असा फतवाच जारी केला.ते आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून पुढे म्हणाले,ज्या ज्या गावात महाविकास आघाडीचे सरपंच आहेत,अशांच्या नावांची यादी काढा,त्या गावांना एक रु.चा ही निधी मिळणार नाही.महाविकास आघाडीचे सरकार असताना मला खूप त्रास दिला गेला,मी आमदार असूनही मला निधी देताना डावलण्यात येत होते.त्यामुळे महाविकास आघाडीच्या सरपंचांना विकासासाठी निधी हवा असेल तर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करावा,असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.त्यांच्या या फतव्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.मंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने अशाप्रकारचे वक्तव्य करणे,हे संविधानातील तरतुदीचे पायमल्ली करणारे आहे.
कुडाळ येथे झालेल्या या कार्यक्रमास प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण,भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.ते पुढे म्हणाले,भाजप हा एक नंबरचा पक्ष व्हायला हवा,ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे,विरोधकांना दूर ठेवणारा विकास हवा असेल तर भाजपमध्ये प्रवेश करा,अशी थेट धमकी त्यांनी आपल्या भाषणात महाविकास आघाडीच्या सरपंचाना दिली.त्यामुळे उपस्थित असलेल्या सर्वांच्या भुवया वर गेल्या.ना.राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताना संविधानातील ” मी समाजातील सर्व घटकांना न्याय देईन व कोणाविषयी आकस व सूडबुद्धीने वागणार नाही,” या दोन वाक्याची आठवण ठेवायला हवी होती.तसेच ते ज्या कडव्या हिंदुत्वाचा सतत पुरस्कार. करत असतात,त्या हिंदू संस्कृतीमध्ये आकस व सूडभावनेला थारा नाही,याचा त्यांना विसर कसा काय पडला ? मंत्रीपदावर राहून अशाप्रकारचे वक्तव्य करणे,हे न्यायाला धरून नाही.गावाच्या विकासाच्या प्रश्नी एक मंत्री भर जाहीर सभेत धमकी देतो व विकासाला खीळ बसेल,अशी कृती करण्याची धमकी देतो,ही बाब न्यायाला धरून नाही.

