दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
शिवसेना ( उबाठा ) व भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आता आत्मचिंतन करायला हवं,
विधानसभा निवडणुका झाल्यानंतर शिवसेना ( उबाठा ) व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस,या दोन पक्षातून आउटगोइंगला आता चांगलाच वेग आला आहे.भाजपच्या प्रभावासमोर गेल्या बारा वर्षात अनेक पक्षांची प्रचंड पडझड झाली.ज्या खासदार व आमदारांची हयात सेना व काँग्रेसमध्ये गेली,ते देखील भाजपच्या वळचणीला गेले,याचा पक्षाच्या धुरीणांनी विचार करायला हवा.मात्र आपली अशी अवस्था का झाली ? यामागची कारणे काय आहेत ? याविषयी या दोन्ही पक्षाचे नेते ते करायला तयार नाहीत.सत्तेच्या राजकारणात केवळ पहिल्या फळीला हाताशी धरून चालत नाही,तर बदलत्या परिस्थितीनुसार वेळोवेळी भाकरी फिरवावी लागते.ते न झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांची सेना व भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या दोन्ही पक्षाच्या गेल्या काही वर्षात अक्षरशः ठिकऱ्या झाल्या.
ज्या बाळासाहेबांनी मराठी माणसाची अस्मिता व हिंदुत्वाला फुंकर घालत पक्षाला सत्तेच्या राजकारणात स्थिरस्थावर केले.नेमके त्याला तिलांजली देत उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्रीपदाच्या हव्यासापोटी २०१९ साली काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी केली व सेनेची वाताहत होण्यास सुरुवात झाली.उद्धव ठाकरे यांनी युतीशी फारकत घेण्याचा जो निर्णय घेतला,त्यामध्ये संजय राऊत,मिलिंद नार्वेकर,सुभाष देसाई,अनिल परब,अनिल देसाई,विनायक राऊत,या थिंक टँकमधील मंडळींचा सहभाग होता.उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांनी दुसऱ्या फळीतील नेत्यांचा कधीही विचार केला नाही.त्यामुळे दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये अंतर्गत धुसफूस सुरू होती.बाळासाहेबाकडून कडव्या हिंदुत्वाचे बाळकडू प्यायलेले हे नाराज शिलेदार संधीची वाट पहात होते.अखेर ती त्यांना भाजपच्या रूपाने मिळाली व सेनेचे ” होत्याचे नव्हते,” झाले.ज्या राजन साळवी यांनी आपली संपूर्ण हयात मातोश्रीच्या चरणी घालवली,काल त्यांनी आपल्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला व ते आज शिंदे गटात प्रवेश करत आहेत.विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पराभवाला हातभार लावणाऱ्या पहिल्या फळीतील विनायक राऊत यांच्याविरोधात त्यांचा आक्षेप होता.तसा तो उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांनी नोंदवलाही,पण त्यांना जाब विचारण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी साळवी यांनाच खडेबोल सुनावले.त्यामुळे बाळासाहेबांचा हा कडवा शिवसैनिक मातोश्रीच्या पायऱ्या उतरला,तो पुन्हा न चढण्याचा पण करूनच…
आपला हा महत्वाचा शिलेदार शिंदे गटात सामील होणार,हे काही लपून राहिले नव्हते.पण उद्धव ठाकरे यांनी त्यांची समजूत तर काढलीच नाही,पण त्यांना अत्यंत चुकीची वागणूक दिली.असा हा प्रकार गेल्या बारा वर्षांत अनेक नेत्यांच्या बाबतीत झाला व ६० % शिवसेना रिकामी झाली.पक्षाने एखादा निर्णय घेण्यापूर्वी त्याचे किती व कसे पडसाद उमटतील,याविषयी अभ्यास असावा लागतो.तसा अभ्यास करून उद्धव ठाकरे यांना सल्ला देणारे त्यांच्या थिंक टँकमध्ये सुभाष देसाई वगळता एकाचीही पात्रता नाही.आहेत ते केवळ खूषमस्करे,आणि याच खुषमस्कऱ्यांमुळे पक्षाची वाताहत होत गेली.आजही उद्धव ठाकरे हे ” जाणाऱ्यांना जाऊ द्या,” असे सांगत जो ताठरपणा दाखवत आहेत,तो विनाशाला आमंत्रण देणारा आहे.काल शरद पवार यांनी शिंदे यांचा सत्कार केल्यामुळे उद्धव ठाकरे व संजय राऊत यांचा पोटशूळ उठला आहे.या सत्कार सोहळ्याला शरद पवार यांनी जायला नको होते,असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.मुळात कोणी काय करावे,हे उद्धव ठाकरे कसे काय ठरवू शकतात.राजकारण व वैयक्तिक संबंध,हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत.त्याची एकमेकांशी गल्लत करणे,मुळात चुकीचे आहे.पण संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचे कान भरले व उद्धव ठाकरे रिऍक्ट झाले.त्यामुळे आता महाविकास आघाडीही व्हेंटिलेटरवर गेली आहे.
महाविकास आघाडीत घटक असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची अवस्थाही काहीशी अशीच आहे.लोकसभा निवडणुकीत थोडेसे यश काय मिळाले,त्या पक्षाच्या नेत्यांच्या अंगात सहस्त्र हत्तीचे बळ संचारले.त्यांचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे ते जगज्जेतेच्या भूमिकेत पायाला भिंगरी लावून राज्यभरात फिरू लागले.पण विधानसभा निवडणुकीत त्यांचे विमान जमिनीवर आपटले व त्यांच्यावर आपल्या पदाचा राजीनामा देण्याची नामुष्की आली.२०१४ साली भाजपने अभूतपूर्व विजय मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ” काँग्रेस मुक्त भारत,” अशी जी हाक दिली होती,ती हळुवारपणे प्रत्यक्षात उतरत असल्याचे जाणवू लागले आहे.दिल्लीत गेल्या तीन निवडणुकांमध्ये त्यांची पाटी चक्क कोरी राहिली.काही किरकोळ उमेदवारांचा अपवाद वगळता अनेक उमेदवारांच्या अनामत रकमा देखील जप्त झाल्या.ज्या पक्षाने सहा दशके देशाची सत्ता राबवली,आज त्या पक्षाची अवस्था अत्यंत दयनीय अशी झाली आहे.या पक्षातही दुसऱ्या फळीतील पदाधिकारी व तळागाळातील कार्यकर्त्यांना काडीची किंमत नाही.अशी ही हलाखीची परिस्थिती लक्षात घेऊन या दोन्ही पक्षाच्या धुरीणांनी निदान आता तरी आत्मचिंतन करायला हवं.

