दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
नौटंकी लक्षात न येण्याइतके वसईचे लोक दुधखुळे नाहीत….
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज्याच्या अनेक मतदारसंघात दिग्गज उमेदवारांना पराभव चाखावा लागला.या पराभवाच्या मागची नेमकी कारणे काय आहेत ? याची उकल करण्यासाठी अनेक आमदारांनी न्यायालयात धाव घेतली आहे.या प्रकरणी न्यायालय काय निर्णय देते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अनपेक्षितपणे झालेल्या या परिवर्तनानंतर किती बदल झाला ? मतदारसंघातील विकासकामांना किती वेग आला ? व अन्य प्रश्नांची उत्तरे लवकर मागणे,हे न्यायाला धरून होणार नाही.कारण सुरुवातीचे दोन ते तीन महिने,हे ” नव्या नवरीच्या,नवलाईचे नऊ दिवस असतात,” ते त्यांना द्यावेच लागतात.
हा दोन महिन्याचा काळ आता जवळपास संपत आला आहे.त्यामुळे परिवर्तनाच्या लाटेत निवडून आलेल्या आमदारांनी कामाला लागावे,अशी अपेक्षा पालघर जिल्हावासीयांकडून व्यक्त करण्यात येत आहे.पण पालघर जिल्ह्यात मात्र तसे पहायला मिळत नाही.नवनिर्वाचित आमदार,हे सत्कार,सोहळे,उदघाटने,
प्रवेश सोहळे,धायमोकलून रडण्याची नौटंकी,खोटी आश्वासने देणे व न केलेल्या कामाचे श्रेय उपटणे,अशा विविध कामात व्यस्त असल्याचे पाहायला मिळत आहे.नालासोपाऱ्याचे आ.राजन नाईक,हे आपण बेघर झालेल्या रहिवाश्याच्या बाबतीत आपण किती संवेदनशील आहोत,हे दाखवण्यासाठी धायमोकलून रडताना पाहायला मिळाले.रडण्याच्या नौटंकीचा वारसा त्यांनी कदाचित पंतप्रधानाकडून मिळवला असावा.त्यांची ही नौटंकी पाहून नालासोपारावासीयांचाही गळा दाटून आला.ही नौटंकी करताना ” मी राज्यसरकारकडे प्रथम लोकांचे पुनर्वसन करा,आणि मग बांधकामे तोडा,” असा आग्रह धरणार असल्याचे सांगितले.पण अवघ्या काही दिवसात आ.नाईक यांच्या डोळ्यादेखत २३ इमारती जमिनदोस्त झाल्या व शेकडो कुटुंबाचे संसार रस्त्यावर आले.या घडामोडीनंतर तेच आ.नाईक हे ” प्रकरण न्यायालयात असल्यामुळे आम्ही काही करू शकत नाही,” सांगत सुटले आहेत.हा प्रकार म्हणजे,” अशी ही बनवाबनवी,” या सिनेमाचा रिमेक असावा,बहुतेक…
त्यानंतर वसई विरार उपप्रदेशाच्या वाढत्या लोकसंख्येच्या या तालुक्याची पाण्याची गरज लक्षात घेऊन माजी आ.हितेंद्र ठाकूर यांनी आठ वर्षांपूर्वी विक्रमगड तालुक्यातील देहर्जे नदीवर आधारीत पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव राज्यसरकारकडे सादर केला होता.त्यानंतर ते या योजनेला मंजुरी मिळावी व आर्थिक निधी देण्यात यावा,यासाठी सतत प्रयत्न करत होते.नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीनंतरही त्यांनी त्याचा पाठपुरावा सुरू ठेवला होता.अखेर काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत १९० द.ल.लि.पाण्याच्या या पाटबंधारे प्रकल्पातंर्गत असलेल्या योजनेला मंत्रिमंडळाने हिरवा कंदील दाखवला.त्यासाठी २५९९.१५ कोटी रु.च्या निधीला मंजुरी देण्यात आली.हा निर्णय जाहीर झाल्यानंतर आ.नाईक यांच्या फंटर्सनी आपली पाठ थोपटून घेण्यास सुरुवात केली.वास्तविक ही पाणीपुरवठा योजना काय आहे ? या योजनेत भेडसावणाऱ्या समस्या काय आहेत ? ही योजना मार्गी लागण्यात वनविभागाकडून कसे अडथळे निर्माण केले गेले ? याविषयीची कोणतीही माहिती नसताना श्रेय उपटण्याचे प्रयत्न करणे,हे ” मड्याच्या टाळूवरील लोणी,” खाण्यासारखे आहे,अशी चर्चा आता सर्वत्र होत आहे.

