दीपक मोहिते,
” मिशन एकनाथ शिंदे,”
एकनाथ शिंदे सध्या ” हाताची घडी,तोंडावर बोट, ” अशा भूमिकेत,
भाजपने विधानसभा निवडणुकीनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात जोरदार मिशन सुरू केले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांना त्यांच्यावर सोडले आहे.विविध आघाडीवर शिंदे यांची कोंडी करण्यात यश मिळवल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्रीपद गणेश नाईक यांना देऊन ” कडवटपणाचे वर्तुळ,” पूर्ण केले आहॆ.
मुख्यमंत्रीपद,खातेवाटप, पालकमंत्रीपद वाटप,या सर्व प्रक्रियेत शिंदे यांना भाजपने चांगलाच दणका दिला.पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद गणेश नाईक यांना देण्यात आल्यामुळे शिंदे प्रचंड नाराज झाले होते.ठाणे जिल्ह्याच्या राजकारणात या दोघांमधून विस्तव जात नाही.मध्यंतरीच्या काळात गणेश नाईक हे गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाल्यानंतर राजकीय विजनवासात गेले होते.त्यांना या निवडणुकीत फडणवीस यांनी तिकीट मिळवून दिले व त्यांना संजीवनी बुटी दिली. त्यानंतर गणेश नाईक हे कॅबिनेटमंत्री,पालकमंत्री व आता ठाणे जिल्ह्याचे संपर्कमंत्री,असे एकामागून एक यशाच्या पायऱ्या चढत गेले.त्यानंतर नाईक हे कामाला लागले,त्यांनी ठाणे येथे जनता दरबार घेण्याचे जाहीर केले.हे सारे महाभारत घडत असताना एकनाथ शिंदे मात्र ” हाताची घडी,तोंडावर बोट,” अशा अवस्थेत पाहायला मिळाले.ठाणे जिल्ह्यासोबत एकनाथ शिंदे यांचे पालघर जिल्ह्यावरही चांगले वर्चस्व आहॆ.पण लोकसभा निवडणुकीपासून भाजपने ते वर्चस्व हळुवारपणे मोडून काढण्यास सुरुवात केली.त्यामुळे एकनाथ शिंदे सध्या वैफल्यग्रस्त झाले आहेत.रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरूनही शिंदे गटाचे भरत गोगावले व राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे,या दोघांमध्ये जोरदार संघर्ष उडाला.फडणवीस यांनी,उभयतांमधील वाद अधिक उफाळून वर येऊ नये, यासाठी पालकमंत्रीपदाला तात्पुरती स्थगिती दिली,पण प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री म्हणून अदिती तटकरे यांनी मानवंदना स्विकारली.या सर्व घडामोडीमुळे एकनाथ शिंदे सध्या प्रचंड तणावाखाली आले आहेत.

