दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
पालघर/ठाणे जिल्ह्यात पालकमंत्री गणेश नाईक चांगलेच सक्रिय,
ठाणे व पालघर जिल्ह्याच्या राजकीय आघाडीवर गेल्या दोन दिवसांपासून वेगवान घडामोडी घडत असून आजच्या घडीला त्या सुप्तावस्थेत असल्या तरी येणाऱ्या काळात त्या उजेडात येण्याची शक्यता आहे.या सर्व घडामोडीत पालकमंत्री गणेश नाईक हे प्रमुख भूमिका निभावत आहेत.काल त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या एका बड्या व नाराज नेत्याची भेट घेऊन अर्धा तास चर्चा केली.तसेच ईडीचे प्रकरणही सध्या मोठ्याप्रमाणात गाजत आहे.या प्रकरणामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.तर एकनाथ शिंदे यांचा गड असलेला ठाणे जिल्हा भेदण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.त्यामुळे एकनाथ शिंदे हे प्रचंड तणावाखाली आले आहेत.
देवेंद्र फडणवीस,पक्षाचे कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण व पालकमंत्री गणेश नाईक हे त्रिकुट आता चांगलेच सक्रिय झाले असून त्यांनी या दोन्ही जिल्ह्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे वर्चस्व मोडीत काढण्याचे प्रयत्न चालवले आहेत.गेल्या काही वर्षात पालघर व ठाणे जिल्ह्यात शिंदे यांचा वरचष्मा निर्माण झाला आहे.पण गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपने शिंदे यांची सर्वच आघाडीवर बऱ्यापैकी कोंडी केली.तिकीट वाटपात त्यांनी शिंदे यांच्यावर कुरघोडी केली होती. जिल्ह्यात विधानसभेच्या पाचही जागांवर भाजपची मंडळी निवडून आली आहेत.पालघर व बोईसर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटातर्फे निवडून आलेले राजेंद्र गावित व विलास तरे हे मूळचे भाजपचे पण तडजोड म्हणून त्यांना शिंदे गटाच्या धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवावी लागली.या दोन्ही मतदारसंघात शिंदे गटाकडे प्रभावी उमेदवार नव्हता,त्यामुळे भाजपने अशाप्रकारची खेळी खेळली.त्यामुळे शिंदे गट या दोन्ही मतदारसंघात सध्या निष्प्रभ अवस्थेत असलेला पाहायला मिळत आहे.
गणेश नाईक यांचा गेल्या चार दशकांचा राजकीय प्रवास,दांडगा अनुभव व या दोन्ही जिल्ह्याच्या राजकीय घडामोडीविषयी असलेली जाण,लक्षात घेऊन त्यांच्याकडे फडणवीस यांनी पालघरचे पालकमंत्री पद सोपवले.फडणवीस यांनी ही खेळी करून एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.लोकसभा व विधानसभा निवडणुकीनंतर गलितगात्र झालेल्या माजी आ.हितेंद्र ठाकूर यांनी पुन्हा डोकं वर काढता कामा नये,यासाठी नाईक हे उत्तम पर्याय ठरू शकतील,हे लक्षात घेऊन त्यांच्याकडे पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहॆ.गणेश नाईक हे सध्या चांगलेच सक्रिय झाले असून त्यांनी पालकमंत्रीपदी आल्या आल्या राजकीय पक्षाशी संबंध नसलेल्या तरुणांना पक्षात सामील करून घेण्याचा धुमधडाका उडवून दिला आहॆ.दोन दिवसापूर्वी बहुजन विकास आघाडीच्या ज्या बड्या नेत्याशी त्यांची भेट झाली त्या नेत्याने गेल्या काही महिन्यापासून आघाडीपासून स्वतःला दूर ठेवले आहे.तसेच या नेत्याचे गणेश नाईक यांच्याशी पूर्वापार संबंध आहे.गणेश नाईक यांचे पालघर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांशी घनिष्ट संबंध आहेत.बोईसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी देखील आता भाजपच्या वाटेवर आहे.गणेश नाईक यांचा कट्टर समर्थक अशी त्यांची ओळख असून बोईसर औद्योगिक क्षेत्रात ते नाईक यांच्या कामगार संघटनेचे गेली अनेक वर्षे काम पाहत आहेत.
गणेश नाईक यांनी ठाण्यातही आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत.जनता दरबारच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना शह देण्याच्या तयारीत आहेत.त्यामुळे शिंदे गटात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.त्यांच्या
या नाराजीबद्दल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रकारांनी विचारणा केली असताना त्यांनी गणेश नाईक यांची भूमिका योग्य असून जनता दरबारच्या माध्यमातून लोकांची कामे जलदगतीने होतील,त्यामुळे जनता दरबार भरवण्यात काही गैर नाही,असे स्पष्ट करत नाईक यांची पाठराखण केली.एकंदरीत या सर्व घडामोडी लक्षात घेता भाजप या दोन्ही जिल्ह्यावर आपले वर्चस्व राखण्यासाठी धूर्त खेळी खेळत आहे.

