दीपक मोहिते,
आत्मपरीक्षण गरजेचे,
पक्षप्रमुखांच्या जवळच्या गोतावळ्यातील लोकांमुळे अनेक राजकीय पक्षाची वाताहत,
विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला जोरदार गळती लागली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसला ( शरद पवार ) लागलेल्या गळतीचे प्रमाण मर्यादित असले तरी शिवसेना ( उबठा ) गट मात्र गळतीमुळे दिवसेंदिवस क्षीण होत चालला आहे.ही गळती रोखणे,दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांनाही शक्य नाही.
शिवसेनेत असलेले अंतर्गत वाद व उद्धव ठाकरे यांच्या अवतीभवती असलेले भाट यामुळे पदाधिकारी व कार्यकर्ते आता पक्षापासून दुरावू लागले आहेत.मुंबई,ठाणे अहिल्यानगर य जिल्ह्यातील अनेक नगरसेवक पदाधिकारी व शिवसैनिक हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल होत आहेत.आजच्या घडीला महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटालाही फारसे महत्व उरलेले नाही.पण त्यातल्या त्यात शिंदे यांची सेना बरी, असे समजून अनेक जण त्यांच्या गटात सामील होत आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यभरातील अनेक पदाधिकारी त्यांची साथ का सोडू लागले आहेत,यावर उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.अहिल्यानगर शहरातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना उबाठाचे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी पक्ष सोडणार आहेत.या सगळ्यांची नाराजी पक्षातील बडे नेते,अनिल परब,अनिल देसाई,उपनेत्या सुषमा अंधारे आणि खा.संजय राऊत यांच्यावर आहे.आक्रमक भाषाशैली असलेल्या अंधारे व राऊत याना पक्षात आलेले महत्व हे आता पक्षाच्या मुळावर आले आहे.उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होईपर्यंत पायात चप्पल घालणार नाही,अशी भीमगर्जना करणाऱ्या मुंबईच्या माजी नगरसेविका राजुल पटेल यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाला जय महाराष्ट्र करत,एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे अहिल्यानगर शहरातील १२ माजी नगरसेवकांसह पदाधिकारी व शिवसैनिक आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत.खा.संजय राऊत यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन या सर्व शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचे सांगण्यात येत आहे. अहिल्यानगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुमारे ३० वाहने घेऊन शिवसैनिक मुंबईकडे रवाना झाले आहेत.
या सर्वांनी आठ दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर शिवसेनेत प्रवेश करण्याची तारीख ठरली.नाराज पदाधिकारी पक्ष सोडणार असल्याची बातमी समजल्यानंतर अंबादास दानवे यांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला.मात्र तो अयशस्वी ठरला.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या असताना हे सारे महाभारत घडत असल्यामुळे सेनेच्या जुन्याजाणत्या नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.माजी नगरसेवक
स्थानिक पातळीवर नेते आणि पदाधिकारी पक्षातून बाहेर पडत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांना पक्षाची नव्याने बांधणी करावी लागणार आहे.पण त्यांच्या पक्षात नव्याने येण्यास सध्या तरी कोणीही तयार नाही.तसेच पक्षातील गळती रोखण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी आदित्य ठाकरे,संजय राऊत हे नेते ” जाणाऱ्यांना आम्ही रोखणार नाही,ज्यांना जायचे असेल तर त्यांनी खुशाल जावे,” असे म्हंटले आहे.
या सर्व अनुभवावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली की पक्षप्रमुखाच्या गोतावळ्यात असलेल्या मूठभर निकटवर्तीयांमुळे आजवर अनेक राजकीय पक्षांची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे,त्यामध्ये शिवसेना ( उबाठा ) मनसे,बहुजन विकास आघाडी,समाजवादी,
बसपा,आम आदमी पार्टी व अन्य प्रादेशिक पक्षाचा समावेश आहे.

