दीपक मोहिते,
” हल्लाबोल,”
देशमुख कुटुंबियांना लवकर न्याय मिळेल,असे वाटत नाही….
गेल्या दोन महिन्यांपासून कराड पुराण सुरू असून महायुतीचे सरकार धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत आहे,हे आता लपून राहिलेले नाही.संतोष देशमुख यांचे बंधू,कन्या व बीडवासीय न्याय मिळावा,यासाठी राज्यसरकारकडे सातत्याने मागणी करत आहेत,पण फडणवीस सरकारच्या हृदयाला पाझर फुटत नाही.दोन महिने उलटून गेल्यानंतरही हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी पोलिसांना सापडत नाहीत.त्यामुळे बीड जिल्हा पोलीस यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक असून पोलिसांवर दबाव असल्यामुळे कराड याला सगळ्या सुविधा उपलब्ध होत आहेत,असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया केला आहे.मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा,यासाठी दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन संबधित कागदपत्रे त्यांच्याकडे सुपूर्त केली.पण अजित पवार या प्रकरणी कोणताही निर्णय घ्यायला तयार नाहीत.
आज ना उद्या या प्रकरणातील फरारी आरोपी पद्धतशीरपणे पोलिसांसमोर हजर होतील.कालांतराने त्यांची जामिनावर सुटका देखील होईल.कारण आता या महायुतीच्या सरकारच्या काळात गुन्हेगारीला राजाश्रय मिळू लागला आहे.गेल्या अडीच वर्षात राज्यात गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले आहे.बलात्कार,हिट अँड रन,हत्या,अपहरण व लूटमार,अशा हजारो घटना घडल्या,पण आपला गृह विभाग सध्या निद्रावस्थेत असल्याचा अनुभव आपण घेत आहोत.निवडणुका होऊन गेल्या आहेत,आता मतदार आमचे काही वाकडं करू शकत नाहीत,या मस्तीत सरकार आता वावरू लागलं आहे.त्यामुळे गुन्हेगारीला खतपाणी घालणारा,गुन्हेगारांना संरक्षण देणारा एक मंत्री सर्व सरकारी तसेच आर्थिक लाभ घेत आज मंत्रीपरिषदेत बिनदिक्कतपणे वावरत आहे.आज बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची दैना झाली आहे.गेल्या काही वर्षात या जिल्ह्यात झालेल्या हत्या लक्षात घेता,आपल्या राज्याचा बिहार झाल्याचे पदोपदी जाणवू लागले आहे.एवढे सारे घडत असताना मुंडे यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता का दाखवण्यात येत नाही.त्यामागची नेमकी कारणे काय आहेत ? याचे एकमेव उत्तर आहे,” अर्थकारण,” होय.कराड टोळीने आजवर जी माया गोळा केली,त्यामधील काही हिस्सा नक्कीच. राजकीय पक्षांना जात असावा.निवडणुका जिंकण्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाला येन केन प्रकारे,” अर्थकारण,” जपावे लागते.त्यासाठी अशा टोळ्यांचा त्यांना आधार हवा तसा असतो.या बीड जिल्ह्याला वाळू व राख तस्करीचा शाप लागलेला आहे.त्यातून अर्थकारण व राजकारण असे समीकरण तयार झाले आहे.या साखळीत पोलीस,शासकीय अधिकारी हे टोळभैरव सामील आहेत,त्यामुळे देशमुख कुटुंबियांना लवकर न्याय मिळेल,असे वाटत नाही.

