दीपक मोहिते,
” फ्रंटलाईन,”
” इमर्जन्सी चित्रपट,” ; हल्लीच्या काळातला सुमार चित्रपट,
माजी पंतप्रधान इंदिराजी गांधी यांना बदनाम करणे व पक्षातील वरिष्ठ नेत्यांची खुशामत करणे,असे दोन उद्देश डोळ्यासमोर ठेवून अभिनेत्री कंगना राणावत यांच्या ” इमर्जन्सी,” या बहुचर्चित सिनेमाला प्रेक्षकांनी कचऱ्याचा डबा दाखवला आहे.हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दणक्यात आपटला असून त्या काळात घडलेल्या सत्य घटनांना दाबून टाकणारे कथानक प्रेक्षकांच्या मनाला रुचले नाही.त्यामुळे पहिल्याच आठवड्यात हा सिनेमा चांगलाच कोसळला.वास्तवाशी फारकत घेतलेला हा चित्रपट प्रेक्षकाच्या मनाला बिलकुल भावला नाही.
महानायिका स्व.इंदिराजी गांधी याना खलनायिका दाखवण्यासाठी निर्मातीने कसे जाणीवपूर्वक प्रयत्न केले,ते या चित्रपटात पाहायला मिळते.खरा इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न या चित्रपटात केल्याचे दिसून आले आहे.देशाची उभारणी व जडणघडण,याकामी आपले सर्वस्व वेचणाऱ्या या महान नेत्यांचे चित्रण अगदी खालच्या पातळीवर जाऊन करण्यात आल्यामुळे या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे.इतिहास कितीही तोडामोड करून सादर केला तरी इतिहास कधीही पुसला जात नाही,हे निर्मातीने चित्रपट बनवताना लक्षात घ्यायला हवं होतं.देशाच्या उभारणीमध्ये इंदिराजी यांचे योगदान नसल्याचे दाखवणे,हे देखील निर्मातीला शक्य झाले नाही.पोलीस व सैन्याने सरकारचे आदेश पाळू नये,जॉर्ज फर्नांडिस यांच्या त्या काळातील भूमिगत कारवाया व अन्य देशविघातक शक्तीचा छुपा अजेंडा,याविषयी चित्रपटात थोडाही लवलेश नाही.इंदिराजींच्या काळात बँकेचे राष्ट्रीयकरण,संस्थानिकांचे तनखे रद्द करणे,गोवा मुक्ती,सिक्कीम विलीनीकरण इ.विषय न हाताळणे,यावरून निर्मातीचा उद्देश स्पष्ट होतो.देश उभारणीच्या कामात इंदिराजीचा कणखरपणा,१९७१ च्या भारत-पाक युद्धात दाखवलेला मुत्सद्दीपणा व कणखरपणा न दाखवून या अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या झालेल्या निर्मातीने हा सिनेमा प्रदर्शित करून नेमके काय मिळवले ? अशी चर्चा करत प्रेक्षक थिएटरबाहेर पडत आहेत.

